फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील खराब कामगिरीनंतर भारतीय फुटबॉलमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांची हकालपट्टी झाली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघानं (AIFF) सोमवारी (17 जून) हा निर्णय घेतला.
स्टिमॅक यांना 2019 मध्ये भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलं होतं. त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता. पण आता एआयएफएफनं कठोर निर्णय घेत स्टिमॅक यांची हकालपट्टी केली आहे. स्टिमॅक यांनी 2019 मध्ये स्टीफन कॉन्स्टंटाईन यांची जागा घेतली होती. स्टिमॅक यांच्या कार्यकाळात भारतीय संघानं 4 प्रमुख ट्रॉफी जिंकल्या, ज्यात दोन SAFF चॅम्पियनशिप, एक इंटरकॉन्टिनेंटल कप आणि एक ट्राय नेशन्स सिरीज यांचा समावेश आहे.
क्रोएशियाचे 56 वर्षीय स्टिमॅक यांनी आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 1998 च्या फिफा विश्वचषकात क्रोएशियन संघानं शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्या विश्वचषकात इगोर स्टिमॅकही क्रोएशियाच्या टीमचे सदस्य होते. 1998 च्या फिफा विश्वचषकात क्रोएशियाचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला होता. मात्र त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही. भारतीय संघाला विश्वचषक पात्रता फेरीत तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात भारताचा कतार कडून 2-1 असा पराभव झाला.
एआयएफएफनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘भारतीय पुरुष संघाची फिफा विश्वचषक 2026 पात्रता फेरीत निराशाजनक कामगिरी झाली. हा निकाल लक्षात घेऊन सर्व सदस्यांनी एकमतानं प्रशिक्षकांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सदस्यांनी मान्य केलं की संघाला पुढे नेण्यासाठी नवीन मुख्य प्रशिक्षक हा सर्वोत्तम पर्याय असेल. स्टिमॅक यांना पदावरून काढण्याची नोटीस पाठवण्यात आली असून त्यांना त्यांच्या जबाबदारीतून तत्काळ मुक्त करण्यात आलं आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाच्या नव्या कोचसाठी दिग्गज खेळाडूची आज मुलाखत, बीसीसीआयला मिळाला एकच अर्ज!
टीम इंडियाला मिळणार पुणेकर विकेटकीपर? MPL मध्ये ऋतुराज गायकवाडची विकेटमागे धमाल; पाहा VIDEO
“तिथे तुमचा वेळ वाया घालवू नका, भारतात परत या”, हरभजन सिंगचा पाकिस्तानी प्रशिक्षकाला सल्ला