आगामी आयसीसी टी२० विश्वचषकासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. विश्वचषकासाठी अनेक हैराण करणाऱ्या नावांना संघात संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी संघाची घोषणा झाल्यानंत भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून एमएस धोनीची निवड केली असल्याची घोषणा केली होती. या निर्णयामध्ये कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचीही महत्वाची भूमिका होती असे सांगितले जात आहे.
परंतु धोनीला संघाचा मार्गदर्शक बनवण्यामागे काय कारण आहे? हे अध्याप स्पष्ट झालेले नसून अनेकांना हा प्रश्न सतावत आहे. अशातच भारतीय संघाचे माजी फलंदाज अजय जडेजा यांनीही बीसीसीआयच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे.
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील काही सामन्यांमध्ये रवींद्र जडेजाला अजिंक्य रहाणेच्या आधी फलंदाजीसाठी पाठवले होते. अजय जडेजांनी धोनीच्या नियुक्तीबाबत बोलताना याच गोष्टीचे उदाहरण दिले आहे. त्यांनी सोनी स्पोर्ट्सवर बोलताना याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, “माझ्यासाठी हे समजून घेणे अशक्य आहे की, यामागे काय विचार असू शकतो. मी एमएस धोनीविषयी नाही बोलत. त्यांची समज कुठपर्यंत आहे किंवा ते किती उपयोगी पडू शकतात, मी तिथपर्यंत जात नाही. हे अगदी तसेच होते जसे की रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी अजिंक्य रहाणेच्या पुढे पाठवणे.”
धोनीच्या नियुक्तीवर अजय जडेजा हैराण झाले असून त्यांना धोनीच्या नियुक्तीमागचे कारण समजू शकत नसल्याचे दिसत आहे. ते पुढे बोतलाना म्हणाले, “मी हैराण आहे, माझ्यापेक्षा मोठा एमएस धोनीचा प्रशंसक कोणी नाहीये. माझ्या मते एमएस धोनी पहिले कर्णधार होते ज्यांनी संघातून बाहेर जाण्याआधी पुढचा कर्णधार तयार केला होता. अशात मी हा विचार करत आहे की, असे काय झाले की बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला.”
दरम्यान, एमएस धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीआधी जवळपास दोन वर्षांपूर्वीच संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तो कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळला असून त्याने या काळात संघासाठी एक चांगला कर्णधार तयार केला आहे. या काळात धोनीने विराटला मोलाचे मार्गदर्शन केले होते. अशात आता धोनी पुन्हा भारतीय संघासोबत जोडला गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल तोंडावर असताना उसळला नवा वाद, ‘या’ कारणामुळे फ्रँचायझींचे बीसीसीआयला पत्र