आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. भारतीय संघाचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, भारतीय गोलंदाज आणि फलंदाज फ्लॉप ठरल्यामुळे भारतीय संघाला हा सामना १० गडी राखून गमवावा लागला. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली होती, ज्यावरून माजी भारतीय क्रिकेटपटू भलतेच नाराज झाले आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी पहिल्या षटकात रोहित शर्माला, तर तिसऱ्या षटकात केएल राहुलला बाद करत माघारी धाडले होते. त्यानंतर विराट कोहली मैदानावर टिकून होता. हा सामना झाल्यानंतर विराट कोहली म्हणाला होता की, “शाहीन आफ्रिदीच्या स्पेलमुळे भारतीय फलंदाजांवर दबाव आला.”
कर्णधार विराट कोहलीच्या या विधानाने अजय जडेजा निराश झाला होता. त्याचे असे म्हणणे आहे की, विराट कोहली सारखा खेळाडू मैदानावर असताना भारतीय संघ दबावात कसा काय येऊ शकतो.
अजय जडेजाने क्रिकबजवर बोलताना म्हटले की, “मी त्या दिवशी विराट कोहलीने केलेले विधान ऐकले. त्याने म्हटले होते की, ‘आमचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर आमच्यावर दबाव आला होता.’ मी या विधानामुळे निराश झालो आहे. जर विराट कोहलीसारखा खेळाडू मैदानावर असेल, तर सामना संपण्याचा संबंधच येत नाही. त्यावेळी त्याने दोन चेंडूही खेळले नव्हते आणि त्याने असा विचार केला होता, यावरून भारतीय संघाचा दृष्टिकोन दिसून येतो.”
तसेच भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पाकिस्तान संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली होती. तर रिषभ पंतने ३९ आणि रवींद्र जडेजाने १३ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाला २० षटकांअखेर ७ बाद १५१ धावा करण्यात यश आले होते.
यानंतर १५२ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिजवानने सर्वाधिक ७९ आणि बाबर आजमने ६८ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाने १० गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी ‘विराटसेने’ला रचावा लागणार इतिहास, करावी लागणार आजवर न जमलेली कामगिरी
अखेर डी कॉकने टेकले गुडघे! भावनिक पत्रासह मागीतली माफी