नुकताच न्यूझीलंडचा भारत दौरा (New Zealand Tour Of India) संपला असून यजमानांनी विजयासह या दौऱ्याचा शेवट केला आहे. गेल्या ४ दिवसांपासून वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याने हा दौरा संपला. भारताने या सामन्यात तब्बल ३७२ धावांच्या फरकाने विजय मिळवला आणि १-० च्या फरकाने मालिकाही जिंकली. यापूर्वीचा कानपूर येथील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. भलेही भारतीय संघाने या कसोटी मालिकेत न्यूझीलंडला पाणी पाजले. परंतु भारतात जन्मलेल्या पण न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या एजाज पटेल (Ajaz Patel) याच्याविरुद्ध मात्र भारतीय संघ जिंकू शकला नाही.
या ३३ वर्षीय क्रिकेटपटूने एका डावात १० विकेट्स घेण्याच्या विश्वविक्रमासह संपूर्ण मालिकेतही सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. याबरोबरच तो दोन्हीही कसोटी सामन्यात फलंदाजी करताना नाबाद राहिला आहे.
एजाजची कसोटी मालिकेतील गोलंदाजी कामगिरी
फिरकी गोलंदाजीत हातखंडा असलेल्या एजाजला पहिल्या कसोटीत विशेष कामगिरी करता आली नव्हती. या सामन्यात तो केवळ ३ विकेट्स घेऊ शकला होता. मात्र त्यापुढील जन्मभूमीतील दुसऱ्या कसोटीत त्याने अद्भुत अशी कामगिरी केली. जन्माने मुंबईकर असलेल्या एजाजने या अंतिम कसोटीत एकूण १४ विकेट्स चटकावल्या. पहिल्या डावात त्याने एकट्याने संपूर्ण भारतीय फलंदाजी फळीला उद्ध्वस्त केले. कसोटी क्रिकेटच्या १४१ वर्षांच्या इतिहासात असे असाधारण काम करणारा तो केवळ तिसराच गोलंदाज ठरला.त्याच्यापूर्वी भारताचे अनिल कुंबळे आणि इंग्लंडचे जिम लॅकर यांनी हा विश्वविक्रम केला होता.
त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने भारताच्या ४ फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे संपूर्ण कसोटी मालिकेत १७ विकेट्स घेत तो मालिकेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
गोलंदाजीसह फलंदाजीतही चमकला एजाज
कौतुकाची बाब म्हणजे, गोलंदाजीत आपले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या एजाजने या मालिकेदरम्यान फलंदाजीतही अनोखी कामगिरी केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात तो ५ धावांवर नाबाद राहिला होता. त्यानंतर संघाच्या दुसऱ्या आणि सामन्यातील शेवटच्या डावात रचिन रविंद्रसोबत शेवटपर्यंत नाबाद राहत त्याने संघाचा पराभव टाळण्यात मोठा वाटा उचलला होता. सामन्याखेर २ धावांवर नाबाद राहत त्याने ही कसोटी अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
या सामन्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय गोलंदाज त्याला बाद करू शकले नाहीत. या सामन्यातील न्यूझीलंडच्या पहिल्या डावात तो शून्यावर नाबाद राहिला. तर दुसऱ्या डावातही ५ चेंडूंचा सामना करताना एकही धाव न करता त्याने आपली विकेट वाचवून ठेवली होती.
महत्वाच्या बातम्या-
फिफ्टी..फिफ्टी..फिफ्टी.. ‘या’ विक्रमात धोनीही नाही पकडू शकणार कोहलीचा हात, ठरलाय पहिला अन् एकमेव
ना गांगुली, ना धोनी; ‘यापूर्वीही सांगितलंय, आताही सांगतोय कोहलीच कसोटीतील सर्वश्रेष्ठ कर्णधार’