आयपीएल 2023 मध्ये रविवारी (23 एप्रिल) दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात सीएसकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. स्पर्धेतील सर्वात तगडी फलंदाजी लाभलेल्या सी एस के फलंदाजांनी पाऊस पाडत हंगामातील सर्वात मोठी धावसंख्या उभी केली. यामध्ये सर्वात मोठे योगदान अनुभवी अजिंक्य रहाणे याने दिले.
गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्याचा इराद्याने मैदानात उतरलेल्या सीएसकेला ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांनी 73 धावांची सलामी दिली. ऋतुराजने 35 धावांची खेळी केली. कॉनवेने हंगामातील सलग चौथे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर चेन्नईसाठी खेळणारे दोन मुंबईकर केकेआरवर बरसले. अजिंक्य रहाणे व शिवम दुबे यांनी 36 चेंडूवर 85 धावांची मोठी भागीदारी रचली. दुबेने 21 चेंडूवर 50 धावा केल्या.
या सर्वांव्यतिरिक्त सर्वाधिक चर्चा झाली ती अजिंक्य रहाणे याच्या फलंदाजीची. अगदी क्रिकेटचे पारंपारिक फटके खेळण्यासोबतच अनेक आधुनिक फटक्यांनी आपली खेळी सजवली. त्याने 29 चेंडूवर नाबाद 71 धावा करताना 6 चौकार व 5 षटकार ठोकले. हे त्याचे हंगामातील दुसरे अर्धशतक ठरले.
राहणे याला आयपीएल लिलावात चेन्नईने त्याच्या मूळ किमतीत म्हणजेच 50 लाखांमध्ये खरेदी केले होते. पहिल्या दोन सामन्यात बाकावर बसावे लागल्यानंतर त्याने मुंबईविरुद्ध पहिला सामना खेळला. या सामन्यात त्याने 27 चेंडूंमध्ये 61 धावा केल्या. त्यानंतर 31 व 37 धावा करण्यात त्याला यश आले. हैदराबादविरुद्ध तो केवळ 9 धावा करू शकलेला. त्यानंतर आता त्याने नाबाद अर्धशतक करत आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले.
त्याने आत्तापर्यंत या हंगामात 5 सामने खेळताना 52.55 च्या सरासरीने 209 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राहणे याचा स्ट्राईक रेट स्पर्धेत सर्वाधिक 199.04 असा राहिला आहे.
(Ajinkya Rahane Another Tremendous Inning For Chennai Super Kings Against KKR In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चिन्नास्वामीवर आरसीबीचा पुन्हा जलवा! टॉपर राजस्थानला दिली 7 धावांनी मात, फाफ-मॅक्सवेल चमकले
सीएसकेचा नवा मि. कंसिस्टंट! कॉनवेच्या कौतुकास्पद सातत्याने घालाल तोंडात बोटे, आत्तापर्यंत गाजवलाय हंगाम