दुलिप ट्रॉफी 2022 (Duleep Trophy) चा अंतिम सामना दक्षिण विभाग विरुद्ध पश्चिम विभाग यांच्या दरम्यान कोइंबतूर येथे रंगला. या सामन्यात अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभाग संघाने दक्षिण विभागाचा 294 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच पश्चिम विभाग या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. त्यांनी 19 व्यांदा दुलिप ट्रॉफीचे विजतेपद पटकावले. या स्पर्धेत नेतृत्व आणि फलंदाजीने छाप पाडणारा भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने सामन्यानंतर बोलताना भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत क्रिकेट प्रणालीचे कौतुक केले.
कोइंबतूर येथे झालेल्या या सामन्यात पश्चिम विभागाने प्रथम फलंदाजी करताना केवळ 270 धावा केलेल्या. प्रत्युत्तरात बाबा इंद्रजीतच्या शतकाच्या जोरावर दक्षिण विभागाने 327 धावा उभारून आघाडी घेतली. पहिल्या डावात फ्लॉप ठरलेल्या यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात झंझावाती द्विशतक झळकावले. त्याने 265 धावा केल्या. सर्फराज खान 127 धावा आणि हेत पटेल 51 धावा करत नाबाद राहिले. यामुळे पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात 4 बळी गमावत 585 धावांचा डोंगर रचला.
विजयासाठी लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण विभाग मुलाणी, उनाडकट आणि शेठ यांच्या माऱ्यासमोर अधिक काळ टिकला नाही. दक्षिण विभागासाठी रोहन कुन्नूमल (93) आणि तेलूकुपल्ली रवी तेजा (53) यांनीच धावा केल्या. अखेरीस ते केवळ 234 धावांवरच गारद झाले. मुलाणीने 4 तर उनाडकट आणि शेठ यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला,
“देशांतर्गत क्रिकेटमध्येही देण्यात येणाऱ्या सुविधा अगदी दर्जेदार आहेत. या ठिकाणी आम्ही चांगला वेळ घालवला. रणजी ट्रॉफी, इराणी ट्रॉफी आणि दुलिप ट्रॉफी स्पर्धा भविष्यातील भारतीय कसोटी क्रिकेटपटू घडवण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.”
अजिंक्य रहाणे या वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय संघाबाहेर आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करून राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याचे त्याचे लक्ष असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुलदीपच्या जाळ्यात अडकला न्यूझीलंड संघ, फिरकी गोलंदाजासमोर फलंदाजांचे लोटांगण
कॅप्टन अजिंक्य रहाणेचा संघ बनला चॅम्पियन! ठरली दुलीप ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात ‘यशस्वी’ टीम
तिसऱ्या टी20साठी रिषभ पंतचा पत्ता कट? जाणून घ्या कारण आणि भारताची संभावित प्लेईंग 11