चेन्नई। रविवारी(31 मार्च) आयपीएल 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सला 8 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.
याबरोबरच राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला षटकांची गती कमी राखल्याने 12 लाख रुपयांचा दंड झाला आहे.
याबद्दल आयपीेएलच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘आयपीएलच्या आचारसंहितेतील किमान षटकांची गती या नियमाअंतर्गत षटकांची गती कमी राखल्याचा हा राजस्थान रॉयल्स संघाचा हा या मोसमातील पहिलाच गुन्हा आहे. रहाणेला 12 लाखांचां दंड ठोठावला आहे.’
याआधी शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडलेल्या सामन्यात मुंबई संघाने षटकांची गती कमी राखल्याने त्यांचा कर्णधार रोहित शर्मालाही 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.
रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 175 धावा करत राजस्थान समोर 20 षटकात विजयासाठी 176 धावांचे आव्हान ठेवले. पण या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 20 षटकात 8 बाद 167 धावाच करता आल्या.






