भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. साउथॅम्प्टनच्या मैदानावर पार पडणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही ही संघ कसून सराव करत आहेत. भारतीय संघाची गेल्या काही सामन्यातील कामगिरी पाहता भारतीय संघाला या सामन्यात विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु इंग्लंडच्या परिस्थितीत वेगवान गोलंदाजांना प्रचंड मदत मिळत असते. ज्यामुळे भारतीय फलंदाज अडचणीत येऊ शकतात. अशातच भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने इंग्लंडमध्ये कशी फलंदाजी करावी याचे काही टिप्स दिले आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणे मध्यक्रमात महत्वाची भूमिका बजावू शकतो. कारण अजिंक्य रहाणेची परदेशातील कामगिरी चांगली आहे. अशातच त्याने बीसीसीआय डॉट टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “जर आपण खेळपट्टीवर टिकून राहिलो तर, इंग्लंड ही फलंदाजीसाठी एक चांगली जागा आहे. फलंदाज म्हणून मला जाणवले की, आपण इंग्लंडमध्ये जितके सरळ आणि चेंडूच्या जवळ खेळता तितकेच आपल्यासाठी चांगले असते. फलंदाज म्हणून मला आणखी एक गोष्ट वाटते की, जरी तुम्ही ७० किंवा ८० धावांवर फलंदाजी करत असाल, तरी तुम्ही खेळपट्टीवर स्थिर राहू शकत नाही. कारण एका चेंडूमुळे तुम्ही बाद होऊन बाहेर जाऊ शकता.”
तसेच तो पुढे म्हणाला, “आम्ही गेल्या दोन वर्षात संघ म्हणून उत्कृष्ट क्रिकेट खेळले आहे. ज्यामुळे आम्ही विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. हे सोपे नव्हते, कारण कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळ करायचा असतो. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाल्यानंतर, आम्ही वेस्ट इंडिज संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. तेव्हापासून आम्ही एकजूट होऊन प्रदर्शन केले आहे.”
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्व केले होते. या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता.
याबद्दल बोलताना तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियामध्ये देशाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी अभिमानास्पद होते. कारण आपण आपल्या देशाचे नेतृत्व करीत आहात आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकणे, विशेषतः पहिला सामना गमावल्यानंतर, ही आमच्यासाठी मोठी मालिका होती. एकूणच, ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही ज्या पद्धतीने खेळलो, त्याबद्दल मी खरोखर आनंदी आहे, परंतु याक्षणी आम्हाला हा सामना खेळायचा आहे आणि एक संघ म्हणून उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
सावधान! प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत इंग्लंडला पराभूत करत न्यूझीलंडने दिला भारतीय संघाला इशारा
“इंग्लंड संघाच्या खराब कामगिरीसाठी टी२० लीग जबाबदार”
हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेनंतर फाफ डू प्लेसिसच्या पत्नीने शेअर केली भावूक करणारी पोस्ट