मायभूमी असो अथवा परदेशी मैदाने जेव्हा भारतीय संघाची फलंदाजी ढासळते, तेव्हा एक फलंदाज संघाची डगमगती गाडी रुळावर आणण्याचे काम करतो. तो म्हणजे, भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे.
रहाणे हा असा फलंदाज आहे, ज्याची फलंदाजी घरच्या मैदानापेक्षा जास्त परदेशी मैदानावर धुमाकूळ घालते. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, त्याची भारतातील फलंदाजी सरासरी ३६.४७ आहे तर परदेशात ४४.४४ इतकी आहे. याबरोबरच त्याने घरच्या मैदानावर ४ शतके केली आहेत. तर परदेशी मैदानांवर दुप्पट ८ शतके केली आहेत. भलेही रहाणेची कसोटी आकडेवारी खूप विशेष राहिली आहे. परंतु आता हाच फलंदाज भारतीय संघाच्या चिंतेचा विषय बनला आहे.
मागील काही काळापासून रहाणेचा कसोटी क्रिकेटमधील फॉर्म अतिशय खराब राहिला आहे. अशात भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जून दरम्यान साउथम्पटन येथे होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या महत्त्वपुर्ण अंतिम सामन्यात त्याला खेळवणे योग्य ठरेल का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अजिंक्य रहाणेचे २०२१ मधील प्रदर्शन निराशाजनक
रहाणेचे यावर्षीचे कसोटी क्रिकेटमधील प्रदर्शन विशेष राहिलेले नाही. त्याला ६ कसोटी सामने खेळताना साध्या २०० धावांचा आकडा पार करता आलेला नाही. त्याने ६ सामन्यातील १० डावात फलंदाजी करताना १९९ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची फक्त १९.९० इतकी राहिली आहे. तसेच त्याने केवळ एका डावात अर्धशतक झळकावले आहे.
इंग्लंडच्या भूमीतील आकडेवारी चिंताजनक
हेच त्याचे इंग्लंडच्या मैदानावरील प्रदर्शनाबाबत बोलायचे झाले तर, येथील खेळपट्ट्यांवर त्याची बॅट शांत राहिली आहे. त्याने इंग्लंडमध्ये १० कसोटी सामन्यातील २० डावात फलंदाजी करताना २९.२६ च्या सरासरीने ५५६ धावा केल्या आहेत. दरम्यान तो दोन वेळा शून्यावर पव्हेलियनला परतला आहे.
त्यातही इंग्लंडमधील मागील १० कसोटी डावात त्याच्या फॉर्ममध्ये बिघाड झाल्याचे दिसले आहे. त्याने मागील १० डावात २५.७० च्या सरासरीने फक्त २५७ धावा केल्या आहेत. यावेळी ७ डावात तो ३० पेक्षाही कमी धावा करत तंबूत परतला आहे. यावरुन स्पष्ट होते की, परदेशातील मैदानांवर दबदबा असणाऱ्या रहाणेची फलंदाजी इंग्लंडच्या मैदानांवर मात्र संघर्ष करताना दिसते.
रहाणेची इंग्लंडमधील आकडेवारी आणि त्याचा कसोटीतील खराब फॉर्म पाहता त्याला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात जागा मिळणे कठीण दिसत आहे. परंतु हा फलंदाज दबावाच्या स्थितीतही स्वत:ला टिकवून ठेवण्याची क्षमता राखतो. कर्णधार विराट कोहलीचाही रहाणेवर विश्वास असल्याचे दिसते. अशात त्याला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात संधी मिळेल का नाही? हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पृथ्वी शॉवर दुर्लक्ष करणं बर नव्हे, तो विरेंद्र सेहवागसारखा फलंदाज आहे,’ माजी निवडकर्त्याचा पाठिंबा
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपुर्वी इंग्लंडच्या ‘या’ गोलंदाजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
मॅन विथ गोल्डन हार्ट! ‘धन्यवाद अण्णा, तू एक जीव वाचवलास’; मध्यरात्री पिडीताच्या मदतीला धावला विहारी






