भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं आहे. रोहितच्या जागी उपकर्णधार जसप्रीत बुमराहकडे टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली. रोहितला ड्रॉप करण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघातील खेळाडूंमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. यानंतर गंभीरनं रोहितला वगळलं, असं बोललं जात होतं. परंतु आता चित्र स्पष्ट झालं आहे. हिटमॅनला वगळण्याचा निर्णय वरून आला आहे, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आलाय.
‘रेव्ह स्पोर्ट्स’च्या एका अहवालानुसार, रोहित शर्माला सिडनी कसोटीतून वगळण्याचा निर्णय केवळ गौतम गंभीरचाच नाही, तर मुख्य निवडकर्ते अजित आगरकरचाही या निर्णयात सहभाग होता. रोहितचं सतत फ्लॉप होणं त्यांच्यासाठी अडचणीचं ठरत होतं. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीनंतर रोहितला वगळण्याची मागणी जोर धरू लागली होती.
मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा सल्ला घेतल्यानंतर हिटमॅनला वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय. या निर्णयात उर्वरित निवड समितीलाही विश्वासात घेण्यात आलं होतं. अहवालात पुढे नमूद करण्यात आलं आहे की, रोहित शर्माला सिडनी कसोटी खेळायची होती, परंतु गौतम गंभीरनं शुबमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये परत आणण्याचा निर्णय घेतला. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटीत गिलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं होतं.
या बॉर्डर-गावस्कर मालिकेत रोहित शर्मा पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्यानं मालिकेचे तीन सामने खेळले, ज्याच्या 5 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याला केवळ 31 धावा करता आल्या. 10 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली. आता येथून रोहितची कसोटी कारकीर्द किती काळ टिकते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा –
पहिल्या दिवसाच्या शेवटच्या बॉलवर राडा! नवख्या कॉन्स्टन्सला बुमराहनं शिकवला धडा
कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची अवस्था वेस्ट इंडिजपेक्षाही वाईट, दोन वर्षांत पाचव्यांदा असं घडलं
भारतीय क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा, सिडनी कसोटी दरम्यान धक्कादायक बातमी समोर