महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आर्थिक वर्ष २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प मांडला. आंतरराष्ट्रीय महिला दिनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद तर करण्यात आलीच आहे. मात्र यात क्रीडा क्षेत्रासाठी एक भव्य तरतूद करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
अजित पवार यांनी महाराष्ट्रात सगळ्यात मोठे क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येत असल्याची घोषणा केली. हे क्रीडा विद्यापीठ पुण्यात उभारले जाणार आहे. यामध्ये २०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची योजना असून ४ नवे अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलातील सुविधांचा पूर्ण उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने त्या परिसरातच हे क्रीडा विद्यापीठ उभे राहील.
या विद्यापीठाबाबतची घोषणा राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी यापूर्वीच केली होती. हे विद्यापीठ यापूर्वी औरंगाबादमध्ये उभे करण्याचा राज्य सरकारचा मानस होता. मात्र तिथे जागा कमी पडत असल्याने त्याऐवजी हे पुण्यात उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बालेवाडी क्रीडा संकुलाचा पूर्ण क्षमतेने अद्याप वापर झाला नसल्या कारणाने तिथेच हे विद्यापीठ उभारणार असल्याचे सुनील केदार यांनी स्पष्ट केले होते.
आता अर्थसंकल्पात याची घोषणा झाल्याने सदर विद्यापीठाच्या निर्माणाला वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना महामारीनंतर थंडावलेल्या क्रीडा क्षेत्राला या घोषणेमुळे नवसंजीवनी मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रातील युवा होतकरू खेळाडूंसाठी या निमित्ताने योग्य व्यासपीठ देखील निर्माण होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
नादच खुळा! विजय हजारे ट्रॉफीत देवदत्त पड्डीकलचं सलग चौथं शतक; रनमशीनची केली बरोबरी
व्वा रे व्वा रिषभ! पाकिस्तानी दिग्गजालाही पाडली फलंदाजीची भुरळ; म्हणाले, पंत डाव्या हाताचा सेहवाग
टीम इंडियातील हा अष्टपैलू माझ्यापेक्षाही श्रेष्ठ; रवी शास्त्रींनी केलं तोंडभरुन कौतुक