भारतीय क्रिकेट नियमक मंडळ (बीसीसीआय) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट क्रिकेट बोर्ड आहे. त्यामुळेच भारतीय संघासाठी खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवर ही पैशांच्या पाऊस पाडला जातो. भारतीय संघातील करारबद्ध खेळाडूंना कोट्यवधी रुपये मानधन मिळते. तसेच चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बोनसही दिला जातो. याबाबतचा खुलासा माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने केला आहे.
आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनेलवरील एका व्हिडिओमध्ये सांगितले की,”एखाद्या फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावले तर त्याला बोनस म्हणून ७ लाख रुपये दिले जातात. तसेच शतक झळकावणाऱ्या फलंदाजाला ५ लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. फक्त फलंदाजांना नव्हे तर गोलंदाजांना ही बोनस मिळतो. जर कुठल्या गोलंदाजाला ५ गडी बाद करण्यात यश आले तर त्या गोलंदाजाला बक्षीस म्हणून ५ लाख रुपये दिले जातात. हा बोनस मॅच फी व्यतिरिक्त दिला जातो.”
आकाश चोप्राच्या बोलण्यावर जर विश्वास ठेवला तर, इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत आर अश्विनने, चेन्नईच्या मैदानावर शतक झळकावले होते. यासोबतच ८ गडी देखील बाद केले होते. या कामगिरीचे त्याला २५ लाख रुपये मिळाले असतील. कारण एक कसोटी सामना खेळण्यासाठी खेळाडूला १५ लाख रुपये दिले जातात. तर शतक झळकावल्यामुळे आणि ५ गडी बाद केल्यामुळे त्याला बोनस म्हणून १० लाख रुपये मिळाले असतील.
ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना किती मानधन?
ए प्लस श्रेणीतील करारबद्ध खेळाडूंना, बीसीसीआयतर्फे ७ कोटी रुपये मानधन दिले जाते. तर ए श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी आणि बी श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी यासोबतच सी श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी रुपये दिले जातात. ही ठरलेली रक्कम दरवर्षी खेळाडूंना दिली जाते.
बीसीसीआयने २८ खेळाडूंना दिले करारबद्ध खेळाडूंच्या यादीत स्थान
बीसीसीआयने एप्रिल महिन्यात करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली होती. या करारामध्ये ३ नवीन खेळाडूंना स्थान देण्यात आले होते. यामध्ये एकूण २८ खेळाडूंचा समावेश आहे. ए प्लस श्रेणीमध्ये कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. तर ए श्रेणीमध्ये रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे. तर वृद्धीमान साहा, उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि मयांक अग्रवाल यांचा बी श्रेणीमध्ये समावेश आहे. सी श्रेणीमध्ये ९ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
फ्रेंच ओपन: झ्वेरेव आणि त्सित्सिपासचा अंतिम ४ जणांमध्ये प्रवेश; उपांत्य सामन्यात येणार आमने-सामने
“आयपीएलमूळे इंग्लंडवाले आपले तळवे चाटतात”, भारतीय दिग्गजाची जीभ घसरली
भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान