वेस्टइंडीज आणि श्रीलंका यांच्यादरम्यान तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून (३ मार्च) सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात यजमान वेस्ट इंडीजने पाहुण्या श्रीलंकेला ४ गडी राखून पराभूत केले. वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने एकाच षटकात मारलेले सलग सहा षटकार या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. त्याचबरोबर, या सामन्यात सर्वाधिक महागडी गोलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या अकीला धनंजया याच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला.
पोलार्डने मारले सहा षटकार
वेस्ट इंडीजच्या डावातील सहाव्या शतकात गोलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या अकीला धनंजया याच्या गोलंदाजीवर वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने सलग सहा षटकार ठोकले.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा हर्शल गिब्स याने वनडे सामन्यात, तर भारताच्या युवराज सिंगने टी२० सामन्यात एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याची किमया केली होती. त्यानंतर या यादीमध्ये आता पोलार्डचा समावेश झाला आहे.
धनंजयाच्या नावे जमा झाला नकोसा विक्रम
पोलार्डने एकाच षटकात सहा षटकार मारल्याने अकीला धनंजयाच्या गोलंदाजीचे आकडे बिघडले. त्याने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना ६२ धावा देऊन तीन गडी बाद केले. विशेष म्हणजे, पोलार्डने सहा षटकार मारल्यानंतर धनंजयाच्या अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर देखील जेसन होल्डरने त्याला षटकार खेचला. अशाप्रकारे, सलग सात चेंडूवर षटकार देण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावे झाला. संपूर्ण सामन्यात त्याच्या गोलंदाजीवर ८ षटकार मारले गेले. हा देखील आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यातील एक विक्रम आहे. यापूर्वी, स्टुअर्ट ब्रॉड व युजवेंद्र चहल यांच्या गोलंदाजीवर प्रत्येकी ७ षटकार ठोकले गेले होते.
धनंजयाने घेतली होती हॅट्रिक
पोलार्डने सहा षटकार ठोकण्याआधीच्या षटकातच म्हणजे वेस्ट इंडिजच्या डावातील चौथ्या षटकात धनंजयाने हॅट्रिक मिळवली होती. सलामीवीर एविन लुईस, ख्रिस गेल व निकोलस पूरन यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करत त्याने आपली हॅट्रीक पूर्ण केलेली. मात्र, पोलार्डने पुढील षटकात धडाकेबाज फलंदाजी करत त्याचा आनंद हिरावून घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
कौतुकास्पद! षटकाराने तुटलेल्या खुर्चीवर मॅक्सवेलने केली सही, समाज कार्यासाठी होणार दान
मैदानात उतरताच विराटची धोनीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी; रुटच्याही नावावर खास विक्रमाची नोंद
स्पायडरमॅन नंतर आता पंत बनला ‘स्टंटमॅन’, विराटलाही करावे लागले कौतुक; व्हिडिओ व्हायरल