बेंगळुरू: बेंगळुरू एफसीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये पदार्पणातील घोडदौड मुख्य प्रशिक्षक अल्बर्ट रोका यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झाली आहे, पण मुळात गेल्या मोसमाच्या अंतिम टप्यात प्रतिकुल परिस्थितीमध्येही त्यांच्या बाजूने काही गोष्टी घडल्या नसत्या तर ते या पदावर राहिलेच नसते. बेंगळुरूच्या साथीत त्यांनी नशीब पालटणारी कामगिरी करून दाखविली आहे.
रोका यांना बेंगळुरूने जुलै 2016 मध्ये पाचारण केले. एएफसी करंडक स्पर्धेची बाद फेरी गाठणे हे त्यांच्यासमोरील पहिले आव्हान होते. मलेशियन विजेत्या जोहोर दारुल ताझीमवरील प्रभावी विजयासह बेंगळुरूने ही कामगिरी साकार केली. अंतिम फेरीत मात्र त्यांना अल क्युवा अल जावीया संघाविरुद्ध पराभूत व्हावे लागले.
त्यानंतर आय-लीगला प्रारंभ झाला. तीन विजय मिळवित बेंगळुरूने सुरवात भक्कम केली होती, पण त्यानंतर सात सामन्यांत एकही विजय मिळू शकला नाही. त्यामुळे जेतेपदाच्या मोहीमेत अडथळा आला. यात घरच्या मैदानावर ईस्ट बंगालविरुद्ध झालेल्या 1-3 अशा पराभवाचा समावेश होता.
अंतिम टप्यात अखेर क्लबला फॉर्म गवसला. शेवटचे चार सामने जिंकत बेंगळुरूने गुणतक्त्यात चौथे स्थान मिळविले. कागदावर सर्वाधिक अंदाजपत्रक असलेल्या बेंगळुरूसारख्या अग्रगण्य क्लबच्या लौकीकाला ही कामगिरी साजेशी नव्हती.
या पार्श्वभूमीवर मोसमाच्या अखेरीस रोका यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाणार अशी चर्चा होती. फेडरेशन करंडक ही त्यांच्यासाठी अखेरची स्पर्ध असेल असे मानले जात होते.
त्या स्पर्धेत बेंगळुरूने गटातून झगडत आगेकूच केली. मोहन बागानविरुद्ध अतिरीक्त वेळेत त्यांनी जेतेपद मिळविले. फेडरेशन जेतेपदामुळे बेंगळुरूला एएफसी करंडक प्ले-ऑफ लढतींत प्रवेश मिळाला. ही कामगिरी रोका यांच्या पथ्यावर पडली. त्यामुळे क्लबने आधीची भुमिका बदलत त्यांचा करार एका वर्षाने वाढविला.
मग हा मोसम रोका यांच्यासाठी छानच ठरला आहे. बेंगळुरूने आयएसएलमध्ये वर्चस्व राखताना विक्रमी 40 गुणांची कमाई केली. प्रत्येक प्रतिस्पर्ध्यावर त्यांनी विजय मिळविला असून बहुतांश सामन्यांत त्यांचा खेळ आश्वासक ठरला आहे. भारतीय फुटबॉलमधील अव्वल साखळीतील 22 वर्षांच्या इतिहासात बेंगळरूची 72.2 अशी विजयाची टक्केवारी विक्रमी ठरली आहे. याचे श्रेय रोका यांना द्यावे लागेल, कारण संघाची निवड त्यांनी केली.
गेल्या चार मोसमांमध्ये बेंगळुरूकडून सर्वाधिक गोल केलेला खेळाडू कधीही परदेशी नव्हता. सुनील छेत्री याच्यावर क्लब प्रमाणाबाहेर अवलंबून होता आणि हा कमकुवत दुवा रोका यांनी हेरला. त्यामुळे त्यांनी व्हेनेझुएलाच्या मिकूला पुर्ण स्वातंत्र्य दिले. हाच मिकू लीगमधील सर्वाधिक कमाई करणारा परदेशी फुटबॉलपटू ठरला. मिकूने 14 गोल करीत रोका यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे.
रोका यांच्याकडे गेल्या वर्षी पर्यायी योजना नव्हती याचा येथे उल्लेख केला पाहिजे. त्यांनी सुरवातीला चार जणांची बचाव फळी ठेवली होती. त्यानंतर तीन जणांचा समावेश झाला. पास द्यायचा आणि आगेकूच करायची अशी त्यांची शैली संथ मानली गेली होती. बचाव करणाऱ्या संघांविरुद्ध ती परिणामकारक ठरणार नाही असेही मानले जात होते.
यंदाच्या आयएसएल मोसमात बेंगळुरूचे चेंडूवरील ताब्याचे प्रमाण काही वेळा कमी होते. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध घरच्या मैदानावर हे घडले होते, पण रोका यांनी दडपणाचा सामना केल्यानंतर प्रतिस्पर्ध्याला चकित करण्यासाठी संघाच्या वेगवान प्रतिआक्रमणावर भिस्त ठेवली. बचाव फळीत एका परदेशी खेळाडूचा समावेश करणे, जुआनन व जॉन जॉन्सनन यांना बचाव फळीत खेळविणे असे धोरण राबविताना संघाने डावपेचांमध्ये विविधता राखली.
फेब्रुवारी महिन्यात बेंगळुरू सर्व स्पर्धांत मिळून सात सामने खेळला. यात त्यांनी सहा विजय मिळविले. वास्तविक बाद फेरीत प्रवेश करताना या बेंगळुरूने गेल्या 12 सामन्यांत अपराजित मालिका राखली आहे. या भरगच्च वेळापत्रकात रोका यांनी संघनिवडीत बरेच बदल केले नाहीत असे नाही, पण बेंगळुरूच्या कामगिरीचा दर्जा सातत्यपूर्ण राहणे वैशिष्ट्य ठरले आहे. याबद्दलच रोका यांचे कौतूक करावे लागेल.