जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यातील चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने 8 बाद 270 धावांवर आपला डाव घोषित केला. तसेच, भारतीय संघाला विजयासाठी 444 धावांचं आव्हान दिलं. मात्र, पहिल्या डावात ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंनी शतक झळकावलं, तसे दुसऱ्या डावात एकानेही शतक ठोकलं नाही. मात्र, एक फलंदाज अर्धशतक झळकावण्यात यशस्वी झाला. तो खेळाडू इतर कुणी नसून ऍलेक्स कॅरे आहे. यावेळी त्याने एक खास विक्रमही नावावर केला.
ऍलेक्स कॅरे अर्धशतक
भारतीय संघाकडून 77वे षटक टाकण्याची जबाबदारी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या खांद्यावर होती. तसेच, स्ट्राईकवर ऍलेक्स कॅरे (Alex Carey) होता. यावेळी जडेजाच्या पहिल्याच चेंडूवर कॅरेने एक धाव घेतली आणि आपले अर्धशतक साकारले. हे अर्धशतक करण्यासाठी त्याने 82 चेंडूंचा सामना केला. या धावा त्याने 6 चौकारांच्या मदतीने केल्या. हे अर्धशतक करत त्याने खास विक्रमही रचला. तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्धशतक करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. विशेष म्हणजे, दुसऱ्या डावात तो नाबाद राहिला. त्याने 105 चेंडूत 8 चौकारांचा पाऊस पाडत 66 धावा केल्या.
स्मिथ आणि हेडची शतके
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करताना सर्व विकेट्स गमावत 469 धावा केल्या होत्या. या धावा ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ (268 चेंडूत 121 धावा) आणि ट्रेविस हेड (174 चेंडूत 163 धावा) यांच्या शतकाच्या जोरावर केल्या होत्या. त्यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाने अर्धशतक केले नाही. ऍलेक्स कॅरे पहिल्या डावात 48 धावांवर बाद झाला होता. तसेच, डेविड वॉर्नर याने 43 धावांची खेळी साकारली होती. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 4 विकेट्स, तर मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, जडेजाला 1 विकेट घेण्यात यश आले होते.
भारतापुढे 444 धावांचे आव्हान
ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या चौथ्या दिवशी 8 विकेट्स गमावत 270 धावांवर दुसरा डाव घोषित केला. यामुळे भारताला विजयासाठी 444 धावांचे आव्हान मिळाले. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी एकट्या ऍलेक्स कॅरे याला अर्धशतक करण्यात यश आले. त्याच्याव्यतिरिक्त मिचेल स्टार्क आणि मार्नस लॅब्यूशेन यांनी प्रत्येकी 41 धावा केल्या. पहिल्या डावात शतक करणारे स्मिथ (34) आणि हेड (18) मोठी खेळी करू शकले नाहीत. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजा चमकला. त्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या., तर मोहम्मद सिराज याला 1 विकेट घेण्यात यश आले.
महत्वाच्या बातम्या-
WTC FINAL : ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 270 धावांवर जाहीर, भारताला कसोटी जिंकण्यासाठी 444 धावांचे आव्हान
‘मी असं कधीच पाहिलं नाही…’, रहाणेच्या बॅटिंग Technique बद्दल एबी डिविलियर्सची मोठी प्रतिक्रिया