---Advertisement---

PSL 2021: नाश्ता म्हणून सडलेले अंडे आणि पाव दिले जातात; इंग्लिश खेळाडूकडून पोलखोल

---Advertisement---

नुकताच पाकिस्तानमधील टी२० लीग, पाकिस्तान सुपर लीग २०२१ ला (पीएसएल) मोठा झटका बसला आहे. या लीगमध्ये सहभागी झालेले तब्बल ७ सदस्य कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला उर्वरित हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करावा लागला. अशात खेळाडूंनी जैव सुरक्षित वातावरणातील नियमांचे पालन न केल्याने असे घडल्याची चर्चा आहे. दरम्यान या लीगमध्ये सहभागी झालेल्या इंग्लंडचा क्रिकेटपटू ऍलेक्स हेल्स याने खळबळजनक खुलासा केला आहे.

त्याचे झाले असे की, पीएसएलमध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या ३ दिवसांत सपोर्ट स्टाफमधील एका कर्मचाऱ्यासह ४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर गुरुवारी (०४ मार्च) अजून ३ खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला. ६ खेळाडूं आणि सपोर्ट स्टाफमधील १ सदस्य असे मिळून एकूण ७ जण मागील ४ दिवसात कोरोना संक्रमित झाल्याने पीएसएलच्या आयोजन समिती आणि फ्रँचायझींच्या मालकांची गुरुवारी बैठक भरवण्यात आली. या बैठकित उर्वरित हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला.

यानंतर कराची किंग्स, पेशावर झाल्मी, मुल्तान सुल्तान्स किंवा क्वेटा ग्लॅडीएटर्स या संघातील खेळाडूंनी कोरोना नियम मोडल्याची चर्चा सुरू झाली. अशात पीएसएलच्या इस्लामाबाद यूनायटेड संघाचे प्रतिनिधित्त्व करत असलेल्या हेल्सने पीसीबीच्या खराब व्यवस्थेसंदर्भात मोठा खुलासा केला.

गुरुवारी रात्री आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याने एक स्टोरी ठेवली. ज्यामध्ये त्याने सडलेले अंडे आणि पाव या अन्नपदार्थांचा फोटो ठेवला. हेच जेवण सर्व खेळाडूंना सकाळी नाश्त्यामध्ये दिले जात असल्याचा दावा त्याने केला. फोटोमध्ये स्पष्ट दिसत होते की, ते जेवण अतिशय निकृष्ट आहे.

हेल्सने नंतर हा फोटो डिलिट केला. परंतु तोवर सोशल मीडियावर त्याचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---