आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरले जातात ‘हे’ तीन बॉल, प्रत्येक क्रिकेटप्रेमीला कारण माहितीच पाहिजे

आज इंटरनॅशनल क्रिकेटला सुरू होऊन 145 वर्षे झाली. या काळात क्रिकेटमध्ये कमालीचे बदल झाले. नवनवीन तंत्रज्ञान आलं. एकाहून एक सरस क्रिकेटर बनले. मात्र, जे खेळाचे बेसिक साहित्य आहे ते म्हणजे बॅट आणि बॉल हे कधीही बदलले नाही. मात्र, त्याच्या आकारांमध्ये थोडाफार बदल नक्कीच झाला. सध्या तीन प्रकारच्या बॉलने क्रिकेट खेळले जाते. लाल, पांढरा आणि गुलाबी बॉल. त्यातीलच लाल बॉलचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत.
जेव्हापासून क्रिकेटला सुरुवात झाली तेव्हापासूनच क्रिकेट लाल बॉलने खेळले जातेय. आजही टेस्ट आणि फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्यासाठी लाल बॉलचाच वापर होतो. 1977 पर्यंत इंटरनॅशनल क्रिकेट लाल बॉलनेच खेळले जायचे. हा लाल बॉल नवा असताना स्विंग आणि सीम होतो. तसेच जुना झाल्यानंतर रिव्हर्स स्विंग होत असतो. हाच लाल बॉल बनवणारी जगातील सर्वात जुनी कंपनी म्हणजे ड्यूक. इंटरनॅशनल क्रिकेटला सुरुवातही झाली नव्हती त्याच्या कित्येक वर्ष आधी म्हणजे 1760 मध्ये ड्यूक बॉल बनवायला सुरुवात झालेली. इंग्लंडमध्ये त्यांचा पहिला कारखाना होता. त्यानंतर क्रिकेट बॉलचा दुसरा ब्रँड तयार झाला कुकाबुरा. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये 1946 पासून हा कुकाबुरा बॉल वापरला जाऊ लागला. भारतात त्यानंतर 1994 पासून एसजी बॉल वापरले जाऊ लागले. ही बेसिक माहिती घेतल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो की, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एकाच ब्रँडच्या बॉलचा वापर का होत नाही? या तिन्हीमध्ये नक्की फरक काय असतो? तर आजच्या या लेखामध्ये आपण हाच फरक जाणून घेऊयात…
या तिन्ही बॉलमधील सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे त्यांची शिवण. भारतात बनणाऱ्या एसजी बॉलची शिवण हाताने केलेली असते. सहा लाईनमध्ये केली गेलेली शिलाई एकमेकांच्या जवळ असते. या एसजी बॉलचा धागा कुकाबुरा व ड्युक बॉल यांच्यापेक्षा काहीसा जाडसर असतो. त्यामुळे बॉलची सीम काहीशी वर आलेली असते. त्यामुळे जेव्हा हा बॉल जुना होतो, तेव्हा जास्त प्रमाणात रिव्हर्स स्विंग होतो. मात्र, त्यासाठी बॉलची एक बाजू चमकावत ठेवावी लागते. कुकाबुरा बॉलचा विचार केला, तर हा बॉल मधल्या रेषेला जोडणाऱ्या दोन धाग्यांमुळे एकसंध राहतो. त्या दोन धाग्यांची शिवण हातानेच केलेली असते. इतर चार लाईनमध्ये केलेली शिलाई मशीनवर करतात. एसजीपेक्षा कुकाबुरा बॉल अधिक कडक असतो. मशीनवर शिवल्याने बॉल जुना झाला तरी त्याद्वारे प्रभावी बाऊंसर टाकण्यास खेळाडूंना अवघड जात नाही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत या बॉलचा वापर केला जात असल्याने तेथील बॉलर्स बाऊंसर मारण्यात वाकबगार बनतात. आता पाहूया ड्युक बॉलची शिवण कशी असते. एसजीप्रमाणे हा बॉलही हाताने शिवला जातो. मात्र, एसजीपेक्षा नाजूक धागा यासाठी वापरण्यात येतो. तसेच, शिलाईतील अंतरही अधिक असते. म्हणून बॉलचा आकार शक्यतो लवकर बदलत नाही. इंग्लंडमध्ये याच कारणाने बॉल दिवसभरही स्विंग होताना दिसतो.
अनेकांना प्रश्न पडतो की, वेगवेगळ्या देशात हे वेगवेगळे बॉल का वापरले जातात? याचे सरळ सोपे कारण आहे तेथील वातावरण. भारत आणि भारतीय उपखंडातील वातावरण शक्यतो उष्ण असते. त्यामुळे येथील पीचेस दोन दिवसात तुटायला लागतात. त्यासाठीच या सर्वांमध्ये मोठ्या धाग्याने शिवलेला एसजी बॉल उपयोगी पडतो, जो लवकर खराब होत नाही. त्यामानाने इंग्लंड आणि इतर सेना देशात ड्युक बॉल व कुकाबुरा बॉल वापरायचे कारण म्हणजे फास्ट बॉलर्सना मिळणारी मदत. कुकाबुरा बॉल बाऊंस आणि ड्युक स्विंग होत असल्याने त्या वातावरणात त्याचा अधिक फायदा बॉलर्सना मिळतो.
आता यातील शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बॉलर्सला कोणत्या बॉलने बॉलिंग करायला आवडते? सध्या जगातील बेस्ट बॉलर असलेल्या जेम्स अँडरसन आणि जसप्रीत बुमराह यांनी यासाठी ड्युकचे नाव घेतले. अगदी दिग्गज वसीम अक्रमही याच ड्युक बॉलचे दीवाने. दुसरीकडे खडूस ऑस्ट्रेलियन्स मात्र आपलं ते सोनं म्हणत कुकाबुराला पसंती देतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्या गावसकरांनी भारतीय क्रिकेटला ओळख मिळवून दिली, त्यांच्या दैदीप्यमान करिअरचा ‘असा’ झाला शेवट, वाचाच
भारतीय क्रिकेटमधील दुर्दैवाचं नाव- पुणेकर वसंत रांजणे, विंडीजविरुद्ध खेळताना रक्ताने माखलेला मोजा