श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (१८ जुलै) वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवत ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कुलदीप यादव व युजवेंद्र चहल या फिरकीपटूंनी गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर कर्णधार शिखर धवनचे नाबाद अर्धशतक, इशान किशन, पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव या यंग ब्रिगेडने फलंदाजीत चमक दाखवत भारताला सोपा विजय मिळवून दिला.
त्यानंतर आता मालिका विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ मंगळवारी (२० जुलै) मैदानात उतरेल. नियमित कर्णधार विराट कोहली वरिष्ठ संघासह इंग्लंडमध्ये असल्याने शिखर धवन श्रीलंका दौर्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. आपल्या नेतृत्वात पहिला मालिका विजय मिळवून देण्यासाठी धवन प्रयत्नशील असेल. तर श्रीलंका संघ दुसऱ्या वनडेत विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. या दुसऱ्या वनडे सामन्याविषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया.
१. कुठे होणार सामना?
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होईल.
२. किती वाजता होणार सामना?
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल. त्यामुळे नाणेफेक २.३० वाजता होईल.
३. कसा पाहता येईल सामना?
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना टिव्हीवर सोनी स्पोर्ट्सच्या सोनी टेन ३ व सोनी सिक्स या वाहिन्यांवर पाहता येतील. तसेच डीडी स्पोर्ट्स चॅनलवरही सामन्याचे थेट प्रक्षेपण होईल. ऑनलाईन सामना पाहण्यासाठी सोनी लिव्ह ऍपचा वापर करता येईल.
दुसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हनः शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव
दुसऱ्या वनडेसाठी श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (यष्टीरक्षक), भानुका राजपक्षे, धनंजय डी सिल्वा, चरिथ असलंका, दसून शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करूणारत्ने, दुष्मंता चमिरा, इसरु उदाना, लक्षन संदाकन.
महत्त्वाच्या बातम्या –
पहिल्या वनडेतील विजयासह सुपर लीग गुणतालिकेत भारताची भरारी, ‘या’ स्थानी घेतली झेप
भारतीय संघासाठी खुशखबर! संपला रिषभ पंतचा क्वारंटाईन कालावधी, ‘या’ तारखेला जोडला जाणार संघासोबत
‘पहिल्या ५.३ षटकात आमचा जलवा होता’, शॉच्या खेळीनंतर सेहवागचे ‘त्या’ खास फोटोसह मजेदार ट्विट






