---Advertisement---

क्रिकेटची पंढरी वानखेडे स्टेडियमचा हा इतिहास आपणास नक्कीच जाणुन घ्यायला आवडेल!

---Advertisement---

मुंबईला गेलेला प्रत्येक माणुस हा मरीन ड्राईव्हला नक्कीच जातो. जरी तो गेला नाही तर तिथे जाव असं सांगणारे त्याला गावाकडे ५-५० लोक सहज भेटतात. अशा या मरीन ड्राईव्हला गेल्यावर आपणास आकाशाला भिडणाऱ्या २-४ फ्लड लाईट्स चटकन दिसतात. त्या आकाशाचा वेध घेणाऱ्या फ्लड लाईट्स दुसरं तिसरं काही नसुन आपल्या वानखेडे स्टेडियमच्या आहेत.

आपण मुंबईकर असो किंवा नसो, आपणास वानखेडे हे नाव जरी ऐकलं तरी अनेक गोष्टी चटकन डोळ्यासमोरुन जातात. भारतातील अनेक ठिकाणं, जागा आहेत जी आपल्या मनात कायम घर करुन राहतात. त्यातीलच एक खास नाव म्हणजे अर्थातच आपलं वानखेडे स्टेडियम. वानखेडे हे आडनाव आहे हे अनेक लोकांना माहीतही नसेल एवढी आपल्या वानखेडे स्टेडियमची जगात ख्याती आहे.

भारतातील अनेक क्रिकेट मैदानांपेक्षा वानखेडे तसे नविनच खासकरुन कोलकात्याचं इडन गार्डन घ्या, नाहीतर चेन्नईच चेपाॅक घ्या. वानखेडे जरी नवे असले तरीही या मैदानाला एक खास असा एक इतिहास आहे. या मैदानाबद्दल अनेकांच्या काही खास आठवणी आहे. मराठी माणसाने जर कसोटी सामना पाहिला असेल तर ७०-८०% वेळा त्याने तो सामना याच मैदानावर पाहिला असतो.

अशा या अनेकांच्या खास आठवणींशी जोडलेल्या खास मैदानाबद्दल जाणून आज घेऊया.

भारत आपला पहिला कसोटी सामना कुठे खेळला असेल तर ते मुंबईत. पुढे जसा खेळ वाढत गेला तसं या शहराला क्रिकेटची पंढरी समजलं जाऊ लागल. अशा या मुंबई शहरात आंतरराष्ट्रीय सामने एकदातरी झालेली ३ मैदान.

१९३३-३४ला भारतीय संघ आपला पहिला कसोटी सामना याच शहरातील बाॅंबे जिमखान्यावर खेळला. हा सामना त्यावेळी भारतावर राज्य करणाऱ्या देशाच्या संघाविरुद्ध अर्थातच इंग्लंड संघाविरुद्ध झाला होता. हा सामना अपेक्षेप्रमाणे इंग्लंडने ९ विकेट्सने जिंकला होता. हा या मैदानावरील भारताचा पहिला आणि शेवटचा कसोटी सामना होता.

त्यानंतर मुंबईला खऱ्या अर्थाने ज्याला स्टेडियम म्हणता येईल असे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे ब्रेबाॅन स्टेडियम मिळाले. १९३३ नंतर या शहरात दुसरा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना व्हायला तब्बल १५ वर्ष वाट पहावी लागली. मधला काळ हा वर्ल्ड वाॅरचा होता. या काळात भारत केवळ ३ सामने खेळला.

त्यामुळे ब्रेबाॅन स्टेडियमला जोरदार महत्त्व येऊन १९४८ ते २००९ या काळात या मैदानावर तब्बल १८ सामने झाले. यातील जेमतेम ५ सामने भारताला जिंकता आले. परंतु याच काळात मुंबई क्रिकेट असोशियशन आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्यात तिकीट वाटपामुळे वाद झाले.

मुंबई क्रिकेट असोशियशन ही मुंबई आणि मुंबई उपनगर क्रिकेटची पालक संस्था तर क्रिकेट क्लब ऑफ इंडिया हा एक क्लब ब्रेबाॅन स्टेडियमची पालक संस्था.

तिकीटांवरुन या दोन मोठ्या संस्थांमधील वाद इतके विकोपाला गेले की तेव्हाचे मुंबई क्रिकेट असोशियशनचे अध्यक्ष बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी तेव्हा नविन मैदान बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांचेच नाव पुढे या मैदानाला देण्यात आले.

१९७४-७५ मध्ये जेव्हा विंडीजची टीम भारत दौऱ्यावर आली होती तेव्हा याच मैदानावर पहिला कसोटी सामना झाला आणि मुंबईकरांना आपले हक्काचे तिसरे आंतरराष्ट्रीय मैदान मिळाले. पुढे हेच होम ग्राऊंड असलेल्या दोन दिग्गजांनी कसोटीत १० हजारांचा टप्पा पार केला. जेव्हा या मैदानावर पहिला सामना झाला तेव्हा याची प्रेक्षक क्षमता होती ४५ हजार.

जे मैदान १९७४मध्ये उभे राहिले त्यात आजपर्यंत दोनवेळा बदल करण्यात आले. त्यातील पहिला बदल हा १९९६मध्ये झाला. या मैदानावर डे-नाईट सामने घेता यावेत म्हणुन हा बदल करण्यात आला. तर २०१०-११मध्ये या मैदानाला पुन्हा नव्याने बांधण्यात आले. त्यामुळे तब्बल २ वर्षांत या मैदानावर एकही रणजी, देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय सामना झाला नाही.

या काळात आयपीएलचे सामने हे मुंबई उपनगरातील डीवाय पाटील स्टेडियम आणि ब्रेबाॅनवर झाले. जेव्हा या मैदानाचे नव्याने बांधकाम झाले तेव्हा cantilever roofs प्रकारचे छत याला टाकण्यात आले. यामुळे मैदावर कोणतेही पिलर नसल्यामुळे प्रेक्षकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय सामने पाहता यावे हा त्यापाठीमागचा मुख्य उद्देश होता. या मैदानाला तब्बल २० लिफ्ट्स आहेत. नव्या बांधकामामुळे मात्र मैदानाची प्रेक्षक क्षमता ४५ हजारवरुन ३३ हजारांवर आली.

या मैदानावर भारतीय संघ आजपर्यंत २५ सामने खेळला असून त्यात ११ सामने जिंकला असून ७ सामने पराभूत झाला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याच मैदानावर आपला २००वा आणि शेवटचा सामना खेळला. भारताविरुद्ध या मैदानावर इंग्लंंड आणि विंडीज प्रत्येकी ८ सामने खेळले आहेत.

आज भारतात तीन आंतरराष्ट्रीय सामने एकदातरी झालेले तीन मैदान असलेली मुंबई व लखनऊ ही केवळ दोन शहरे आहेत. २०११ विश्वचषकात धोनीने जो उंच हवेत षटकार खेचत सामना जिंकला तो याच मैदानावर.

या स्टेडियममध्ये ७ स्टॅंड आहेत त्यात सुनिल गावसकर स्टॅंड, नाॅर्थ स्टॅंड, विजय मर्चंट स्टॅंड, सचिन तेंडूलकर स्टॅंड, एमसीए पविलीयन, दिवेचा स्टॅंड आणि गरवारे पव्हेलियनचा समावेश आहेत. मुंबईकर क्रिकेट चाहते असे काही कट्टर आहेत की ते सामना आपल्या ठरलेलेल्याच स्टॅंडमधून पाहतात. गमतीचा भाग म्हणजे यातील जे नाॅर्थ स्टॅंड आहे त्याचे खास ट्विटर अकाऊॅंटही आहे. ज्याला तब्बल साडेसहा हजार फाॅलोवर्स आहे.

प्रत्येक मैदानाला दोन एंड असतात. एंड म्हणजे ज्या बाजूने गोलंदाज गोलंदाजी करतो. मुंबईत जे दोन एंड आहे त्यातील एक म्हणजे गरवारे पव्हेलियन एंड आणि दुसरा म्हणजे टाटा एंड.

याच मैदानावर जो पत्रकारांसाठी खास कक्ष आहे त्याचे नाव आहे स्व. बाळासाहेब प्रेस बाॅक्स. सामन्याचे वार्तांकन करण्यासाठी कोणत्याही मोठ्या स्टेडियममध्ये मोठे प्रेस बाॅक्स असतात. ज्यामुळे घरी असलेल्या चाहत्यांपर्यंत त्या सामन्याचे खास वार्तांकन पोहचवता येईल.

याच मैदानावर अनेक खास विक्रमही झाले आहेत. त्यातील सर्वात खास विक्रम म्हणजे क्लाइव्ह लाॅईडच्या नाबाद २४२ धावा, भारताचा न्यूझीलंडविरुद्धाचा विजय, सुनिल गावसकर यांच्या न्यूझीलंडविरुद्धच्या २०५ धावांची खेळी, इयान बाॅथम यांचे शानदार शतक, कांबळीच्या २२४ धावा तसेच आर अश्विनचे शतक या काही त्या खास खेळी आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणुन बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट बोर्डाकडे पाहिले जाते. याच बीसीसीआयचे मुख्यालय गेली काही वर्ष याच स्टेडियमच्या तिसऱ्या मजल्यावर आहे आणि जेव्हा कोणत्याही दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होते ती याच मुख्यालयातून.

अन्य वाचनीय लेख- 

असा आहे विश्वचषकात विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या ट्राॅफीचा इतिहास

क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चा झालेली ती शुन्य धावेची खेळी

खेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम…

…तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment