---Advertisement---

MPL 2025: कोण आहेत एमपीएल 2025 मधील हेड कोच, केलीय महाराष्ट्र क्रिकेटची भरपूर सेवा

On: शुक्रवार, मे 30, 2025 7:32 PM
---Advertisement---

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) चा रोमांच सुरू होण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक आहेत. पुण्याजवळील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पुन्हा एकदा क्रिकेटशौकिनांना या स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळेल. एमपीएलमध्ये सर्व संघ मजबूत भासत असताना, त्या संघातील खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या, मुख्य प्रशिक्षकांविषयी आपण जाणून घेऊया.

पीबीजी कोल्हापूर टस्कर्स- एमपीएलच्या पहिल्या दोन हंगामात एकदा उपविजेता व एकदा तिसऱ्या क्रमांकावर हंगाम समाप्त करणारा पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघ यावेळी विजेतेपदासाठी दावेदार मानला जातोय. संघाचे नेतृत्व अनुभवी राहुल त्रिपाठी करताना दिसेल. यासोबत संघात अनेक दमदार खेळाडू सामील आहेत. त्याचसोबत संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून अक्षय दरेकर (Akshay Darekar) याच्याकडे जबाबदारी दिली गेली आहे. खेळाडू म्हणून अक्षय याने महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी जवळपास दहा वर्ष आपले योगदान दिले. सध्या केवळ 36 वर्षांचा असलेला अक्षय, प्रथमच मुख्य प्रशिक्षक म्हणून भूमिका निभावेल.

ईगल नाशिक टायटन्स- कोल्हापूर टस्कर्स प्रमाणेच ईगल नाशिक टायटन्स संघानेही एका हंगामात अंतिम फेरी गाठली होती. तर दुसऱ्या हंगामात तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानलेले. या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून समद फल्लाह (Samad Fallah) जबाबदारी सांभाळतो. समद पहिल्या हंगामापासून संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. खेळाडू म्हणून डावखुरा वेगवान गोलंदाज राहिलेल्या समदने महाराष्ट्रासाठी रणजी ट्रॉफी इतिहासात सर्वाधिक बळी मिळवले आहेत.

सातारा वॉरियर्स- एमपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या सातारा वॉरियर्स संघाकडे सर्वांची नजर आहे. अनेक गुणवान खेळाडू या संघात दिसून येतात. या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्राचा माजी रणजीपटू आशिष सूर्यवंशी (Ashish Suryavanshi) याची निवड केली गेली आहे. आशिष याला क्रिकेट प्रशासनातीलही मोठा अनुभव असल्याने वॉरियर्स फ्रॅंचायझीचा हेड ऑफ क्रिकेट म्हणून देखील तो काम पाहतो.

पुणेरी बाप्पा- एमपीएलमधील सर्वात प्रसिद्ध फ्रॅंचाईजी म्हणून पुणेरी बाप्पा संघाकडे पाहिले जाते. ऋतुराज गायकवाड या संघाचे नेतृत्व करतो. मात्र, अद्याप या संघाला स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आली नाही. ऋतुराज, यश क्षीरसागर, नौशाद शेख व मुर्तझा ट्रंकवाला यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंनी सजलेल्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून संदीप चव्हाण (Sanadiip Chavan) हे काम पाहतात. बीसीसीआयच्या प्रशिक्षण कार्यक्रमातील लेव्हल 1 चे ते प्रशिक्षक आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनात पुणेरी बाप्पाने कॉर्पोरेट शिल्ड जिंकली होती.

रायगड रॉयल्स- आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचे काही भाग असलेल्या रायगड रॉयल्स संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये पहिल्या हंगामापासून अनेक दिग्गज दिसले आहेत. पहिल्या हंगामात श्रीलंकेचा सर्वकालीन महान गोलंदाज चमिंडा वास हा संघाचा प्रशिक्षक होता. सध्या महाराष्ट्राचा माजी क्रिकेटपटू व देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध प्रशिक्षक शिरीष कामठे (Shirish Kamthe) संघाला मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर मेंटर म्हणून संघाशी जोडलेले दिसतात.

रत्नागिरी जेट्स- एमपीएलमधील सर्वात यशस्वी संघ रत्नागिरी जेट्स यांनी एमपीएल 2025 साठी पुन्हा एकदा रणजित पांडे (Ranjit Pande) यांच्यावर विश्वास ठेवला आहे. पांडे यांच्याच मार्गदर्शनाखाली संघाने दोन्ही विजेतेपदे पटकावली होते. पांडे यांनी महाराष्ट्रासाठी रणजी क्रिकेट देखील खेळले होते.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मार्गदर्शनाने स्पर्धेची तयारी सुरू आहे. यंदा देखील सर्व प्रेक्षकांना संपूर्ण स्पर्धेसाठी गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विनामूल्य प्रवेश दिला जाईल. ही स्पर्धा JioHotstar व Star Sports 2 येथे थेट प्रक्षेपित केली जाईल. यासोबतच प्रथमच WMPL ही चार महिला संघांदरम्यान पार पडेल. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---