पुढच्या वर्षी भारतीय क्रिकेट संघ अमेरिका आणि कॅनडामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसला, तर नवल वाटायला नको. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड भारतासोबतच्या टी-20 मालिकेतील काही सामने या दोन उत्तर अमेरिकन देशांमध्ये आयोजित करण्याची तयारी करत आहे. संभाव्य यजमान शहरांमध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. आणि लॉस एंजेलिस, तसेच कॅनडातील टोरंटो यांचा समावेश आहे. या उपक्रमामागचा मुख्य उद्देश उत्तर अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार करणे हा आहे. याशिवाय, याच दौऱ्यादरम्यान भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय (ODI) आणि कसोटी मालिकाही खेळू शकतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अजूनही 2027-2031 या कालावधीसाठी फ्युचर टूर्स प्रोग्राम (FTP) जाहीर केलेला नाही; मात्र, बाली येथे झालेल्या अलीकडील आयसीसीच्या त्रैमासिक बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती. ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’ च्या अहवालानुसार, वेस्ट इंडिज जुलै 2027 मध्ये भारताचे यजमानपद भूषवून पुढच्या क्रिकेट चक्राची सुरुवात करू शकते. या दौऱ्यात दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यापैकी दोन टी-20 सामने उत्तर अमेरिकेत आयोजित केले जाऊ शकतात, ज्यासाठी एकाच ठिकाणाची निवड करण्याची योजना आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 सामन्यांच्या आयोजनासाठी वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) आणि टोरंटो (कॅनडा) ही शहरे आघाडीवर आहेत. याव्यतिरिक्त, पोमोना (Pomona) येथेही सामना आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. हे ठिकाण 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील क्रिकेट स्पर्धांसाठी नक्की करण्यात आले आहे. फ्लोरिडातील लॉडरहिलचाही संभाव्य यजमान ठिकाण म्हणून विचार केला जात आहे. गेल्या दशकात, वेस्ट इंडिजने फ्लोरिडातील लॉडरहिल येथील ब्रोवार्ड काउंटी स्टेडियमवर अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन केले आहे. भारतीय संघानेही या मैदानावर सामने खेळले आहेत.
क्रिकेट वेस्ट इंडिजचे कॅनडासोबत घनिष्ठ संबंध आहेत. याव्यतिरिक्त, युनायटेड स्टेट्समधील मेजर लीग क्रिकेटमधील ‘वॉशिंग्टन फ्रीडम’ या फ्रँचायझीने 10000 प्रेक्षकांची क्षमता असलेल्या स्टेडियमच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.
‘ईएसपीएनक्रिकइन्फो’ (ESPNcricinfo) शी बोलताना, ‘क्रिकेट वेस्ट इंडीज’चे अध्यक्ष किशोर शॅलो यांनी सांगितले की, उत्तर अमेरिकेत क्रिकेटचा विस्तार करणे हा त्यांच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे पाऊल क्रिकेट या खेळासाठी आणि वेस्ट इंडीजसाठीही अत्यंत आवश्यक आहे. अमेरिकेने टी-20 विश्वचषकातील सामन्यांचे आयोजन केले आहे आणि 2028 मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिक होणार आहे, हे लक्षात घेता आयसीसीनेही (ICC) गेल्या काही वर्षांत या प्रदेशात गुंतवणूक केली आहे.





