पुणे | विनर अकादमी, रिग्रीन संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना आझम कॅम्पस मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या आबेदा इनामदार ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली आहे.
एकतर्फी झालेल्या लढतीत विनर अकादमी संघाने पुणे फाल्कन्स संघाला तब्बल १३२ धावांनी पराभूत करताना स्पर्धेत आगेकूच केली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १५ षटकांत २ बाद १७७ धावा केल्या.
सई पुरंदरेने धडाकेबाज फलंदाजी करताना ४८ चेंडूत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने ९२ धावांची खेळी केली. तिला नेहा बडविकने ७ चौकारांसह ४६ धावा करताना सुरेख साथ दिली. फाल्कन्स संघाकडून सारिका डाकरे व सविता ठाकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
वैष्णवी काळे व वर्षा चौधरीच्या भेदक गोलंदाजीने फाल्कन्स संघाचा डाव निर्धारित १५ षटकांत ९ बाद ४५ धावांवर संपुष्टात आला. वैष्णवी काळेने ३ तर वर्षा चौधरीने २ गडी बाद करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. फाल्कन्स संघाकडून पूनम खेमणार (९), पूजा जैनने नाबाद ८ धावांची खेळी केली.
रिग्रीन संघाने वेरॉक वेंगसरकर अकादमी संघाला ५३ धावांनी पराभूत केले. रिग्रीन पुणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १५ षटकांत ३ बाद ११५ धावसंख्या उभारली. मुक्ता मगरे ४४ (५ चौकार), तेजल हसबनीस ३९ (४ चौकार) तर, वैष्णवी रवालीया १४ यांनी संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
प्राजक्ता डुंबरेने २ तर आरती बेनिवालने १ गडी बाद केला. ११६ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या वेरॉक वेंगसरकर अकादमी संघाला निर्धारित १५ षटकांत ६ बाद ६२ धावांपर्यंतच मजल मारता आली. यात श्रद्धा पोखरकरने २० (२ चौकार) धावांची खेळी केली. रिग्रीन संघाकडून सायली अभ्यंकर २ तर, इशा पाठारे व पालवी विद्वांस यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. मुक्ता मागरेला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पीडीसीए संघाने सोलापूर संघाला ९ गडी राखून पराभूत केले. सोलापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १५ षटकांत ८ बाद ५७ धावांपर्यंत मजल मारली. सोलापूर संघाकडून अंबिका वाटाडेने १८ (१ चौकार) तर समृद्धी म्हात्रेने ११ (१ चौकार) धावांची खेळी केली. पीडीसीए संघाकडून रोहिणी मानेने ३, प्रियांका कुंभारने एक गडी बाद केला. पीडीसीए संघाने अदिती काळे २९ (३ चौकार) व संजाना शिंदे १४ (१ चौकार) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ५८ धावांचे आव्हान १ गड्याच्या मोबदल्यात १०.२ षटकांत पूर्ण केले. मानसी बोर्डेने १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक :
विनर अकादमी : १५ षटकांत २ बाद १७७. (सई पुरंदरे ९२ (१० चौकार, २ षटकार), नेहा बडविक ४६ (७ चौकार), सारिका कोळी १५ (३ चौकार), श्वेता जाधव १४ (२ चौकार), सारिका डाकरे ३-०-१६-१, सविता ठाकर २-०-२३-१) वि वि पुणे फाल्कन्स १५ षटकांत ९ बाद ४५ (पूनम खेमणार ९ (२ चौकार), पूजा जैन ८, वैष्णवी काळे २-१-४-३, वर्षा चौधरी ३-१-५-२, सारिका कोळी २-०-३-१, उत्कर्षा पवार ३-०-४-१, आफरीन खान १-०-८-१, अपूर्वा भाद्वाज २-०-११-१)
रिग्रीन : १५ षटकांत ३ बाद ११५ (मुक्ता मगरे ४४ (४ चौकार), तेजल हसबनीस ३९ (४ चौकार) प्राजक्ता डुंबरे ३-०-२५-२, आरती बेनिवाल ३-०-२०-१) वि वि वेरॉक वेंगसरकर अकादमी १५ षटकांत ६ बाद ६२ (श्रद्धा पोखरकर २० (२ चौकार), ऋतुजा गिलबिले ११ (१ चौकार), स्वांजली मुळे नाबाद ११(१ चौकार), सायली अभ्यंकर ३-०-८-२, इशा पाठारे ३-०-९-१, पालवी विद्वांस ३-०-१४-१)
सोलापूर : १५ षटकांत ८ बाद ५७ (अंबिका वाटाडे १८ (१ चौकार), समृद्धी म्हात्रे ११ (१ चौकार) रोहिणी माने ३-१-८-३, प्रियांका कुंभार ३-०-१७-१) पराभूत वि पीडीसीए १०.२ षटकांत १ बाद ५८ (अदिती काळे २९ (३ चौकार), संजना शिंदे १४ (१ चौकार), मानसी बोर्डे ३-०-१२-१)