मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ६७ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने गुजरात टायटन्सला ८ विकेट्सने पराभूत केले. गुरुवारी (१९ मे) वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात विजय मिळवल्याने बेंगलोरने प्लेऑफमधील आपले आव्हानही कायम राखले आहे. मात्र, बेंगलोरच्या या गुजरातवरील विजयाने पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादचे आव्हानही संपुष्टात आले. त्यामुळे आता आयपीएलला नवा विजेता मिळण्याचीही शक्यता वाढली आहे.
गेल्या १२ वर्षांतील विजेते संघ बाहेर
बेंगलोरच्या (RCB) या विजयानंतर आयपीएल २०२२ च्या प्लेऑफचे (IPL 2022 Playoffs) समीकरण पाहिले, तर लक्षात येते गेल्या १२ वर्षांत ज्या संघांनी आयपीएलची ट्रॉफी (IPL trophy) उंचावली, ते सर्व संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे. २०१० पासून चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनीच आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. पण, यंदाच्या आयपीएल हंगामात या सर्वच संघांची कामगिरी तशी सुमार राहिली. त्यामुळे साखळी फेरी पूर्ण होण्यापूर्वीच या संघांचे प्लेऑफला जाण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे.
सध्या स्पर्धेत केवळ एकच विजेता संघ कायम
आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनी नव्याने प्रवेश केला होता. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ आपल्याच दमदार कामगिरीच्या जोरावर पहिल्याच आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये पोहचले आहे. आयपीएल २०२२ च्या प्लेऑफमध्ये पोहचणारे पहिले दोन संघ होण्याचा मानही या दोन संघांनाच मिळाला.
पण, आता प्लेऑफच्या उर्वरित २ जागांसाठी राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स या तीन संघांत स्पर्धा पाहायला मिळत आहे. या तिन्ही संघांतील केवळ राजस्थान रॉयल्स असा संघ आहे, ज्यांनी आयपीएल ट्रॉफी जिंकली (IPL Winner) आहे.
आता या तीन संघांमध्ये बेंगलोरचे सर्व १४ साखळी सामने खेळून झाले आहेत, तर राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध शुक्रवारी (२० मे) अखेरचा साखळी सामना होणार आहे. या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला, तर ते थेट प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहेत. पण, जर राजस्थानचा पराभव झाला, तर त्यांना नेटरनरेटवर अवलंबून राहावे लागेल. पण, राजस्थानसाठी (Rajasthan Royals) जमेची बाजू अशी की त्यांचा नेटरनरेट सध्या तरी बेंगलोर आणि दिल्लीपेक्षा चांगला आहे.
तसेच दिल्लीला अखेरचा साखळी सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना २१ मे रोजी होणार आहे. या सामन्यात दिल्लीने विजय मिळवल्यास दिल्ली आणि बेंगलोर यांच्यातील नेटरनरेट ज्याचा चांगला असेल, तो प्लेऑफची फेरी गाठेल. पण, जर दिल्ली मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभूत झाले, तर बेंगलोर आणि राजस्थान यांना प्लेऑफला पोहचण्यात कोणतीच अडचण होणार नाही.
त्यामुळे आता स्पर्धेत कायम असणाऱ्या एकूण ५ संघांचा विचार केल्यास ४ संघांनी एकदाही आयपीएल ट्रॉफी उंचावलेली नाही, केवळ राजस्थान रॉयल्सने २००८ साली आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला होता. त्यामुळे यंदा आयपीएलला एकतर नवा विजेता मिळू शकतो किंवा तब्बल १४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राजस्थान रॉयल्स पुन्हा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर करू शकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
राहुल द्रविडनी शोधलेला हिरा ‘आयुष बदोनी’ गाजवतोय आयपीएल, वाचा त्याचा रोमांचक प्रवास
बंगळूरूचं भविष्य मुंबईच्या हाती असल्याचं समजताच कर्णधार फाफने रोहितला केली ‘ही’ विनंती
आरसीबीच्या चाहत्यांना विराटकडून मोठ्ठ गिफ्ट! पण चाहत्यांनीही तब्बल दीड वर्षे वाट पाहिलीये