४ वर्षांतून एकदा आयोजण्यात येणारी क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे विश्वचषक. १९७५ मध्ये सुरु झालेल्या विश्वचषकाचे आतापर्यंत १२ पर्व झाले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५मध्ये सर्वाधिक ५ वेळा विश्वचषक पटकावला आहे.
तर, वेस्ट इंडिजने (१९७५ व १९७९) आणि भारताने (१९८३ व २०११) प्रत्येकी २ वेळा चषकावर आपले नाव कोरले आहे. तर, इंग्लंडने २०१९, श्रीलंकाने १९९६ आणि पाकिस्तानने १९९२मध्ये विश्वचषक जिंकला आहे.
यापैकी फक्त ३ असे संघ (भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका) आहेत, जे आशिया खंडात येतात. त्यामुळे त्यांना आशियाई संघ संबोधले जाते. या ३ आशियाई संघातील शानदार प्रदर्शन करणाऱ्या दिग्गज खेळाडूंचा मिळून सार्वकालिन एकादश संघ तयार करण्यात आला आहे.
असा असेल विश्वविजेत्या आशियाई संघातील दिग्गज खेळाडूंचा मिळून केलेला सार्वकालिन एकादश संघ
सलामीवीर फलंदाज –
सनथ जयसूर्या
श्रीलंकाचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्या याने १९९६च्या विश्वचषकात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही शानदार प्रदर्शन केले होते. फलंदाजी करताना त्याने संपूर्ण चषकात ६ सामन्यात २ अर्धशतके करत एकूण २२१ धावा केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १३१.५४ इतका होता. तर, जयसूर्याने गोलंदाजी करताना ३३च्या सरासरीने ७ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या दमदार कामगिरीमुळे तो विश्वचषकात मालिकावीर बनला होता.
सचिन तेंडुलकर
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत ६ विश्वचषक खेळले होते. परंतु, विश्वचषक जिंकण्याचे त्याचे स्वप्न फक्त २०११ला पूर्ण झाले. यावेळी सचिन संपूर्ण विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा दूसरा तर भारतीय संघातील पहिला फलंदाज होता. त्याने ९ सामन्यात २ शतके आणि २ अर्धशतके करत ४८२ धावा केल्या होत्या. तसेच तो विश्वचषकातील उपांत्य फेरी सामन्यात सामनावीर बनला होता.
त्यामुळे सार्वकालिन एकादश संघाचे सलामीवीर म्हणून जयसूर्या आणि सचिन यांची निवड करण्यात आली आहे.
मधल्या फळीतील फलंदाज –
मोहिंदर अमरनाथ
भारताचे माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांना मधल्या फळीतील फलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे. ते १९८३ सालच्या विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा करण्याऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चौथ्या स्थानावर होते. संपूर्ण चषकात ८ सामन्यात त्यांनी २३७ धावा आणि ८ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच ते उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात सामनावीर बनले होते.
जावेद मियांदाद
पाकिस्तानचे दिग्गज फलंदाज जावेद मियांदाद हे १९९२ सालच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे दूसरे फलंदाज होते. त्यांनी संपूर्ण चषकात पाकिस्तानकडून ९ सामन्यात ५ अर्धशतके करत ४३७ धावा केल्या होत्या. उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात मियांदादचे योगदान महत्त्वाचे ठरले होते.
अरविंद डी सिल्वा
१९९६ सालच्या विश्वचषकात श्रीलंकेचा अरविंद डी सिल्वा याने उत्तम प्रदर्शन केले होते. यावेळी ६ सामन्यात त्याने श्रीलंकाकडून खेळताना २ शतक आणि २ अर्धशतक करत एकूण ४४८ धावा केल्या होत्या. यासह तो श्रीलंकाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. शिवाय त्याने ४ विकेट्सही घेतल्या होत्या. तो उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात सामनावीर ठरला होता. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना सिल्वाने शानदार शतक ठोकले होते. याबरोबरच ३ विकेट्सही घेतल्या होत्या.
अष्टपैलू क्रिकेटपटू आणि यष्टीरक्षक –
युवराज सिंग
भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने २०११सालच्या विश्वचषकात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याची अष्टपेलू क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याने संपूर्ण विश्वचषकात ९ सामने खेळत ३६२ धावा केल्या होत्या. यात त्याच्या एका शतकाचा आणि ४ अर्धशतकांचा समावेश होता. तसेच त्याने १५ विकेट्सही घेतल्या होत्या. यात एका सामन्यातील एका डावात त्याने घेतलेल्या ५ विकेट्सचा समावेश होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरी सामन्यात युवराज सामनावीर ठरला होता. शिवाय, त्याला २०११सालच्या विश्वचषकातील मालिकावीर पुरस्कारही देण्यात आला होता.
एमएस धोनी
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची सार्वाकालिन एकादश संघात यष्टारक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. धोनीने २०११सालच्या विश्वचषकात ९ सामन्यात २४१ दावा केल्या होत्या.यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश होता. तसेच, त्याने सर्वाधिक नाबाद ९१ धावा केल्या होत्या. अंतिम सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला होता.
कर्णधार –
कपिल देव
भारताला १९८३ सालचे विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधार कपिल देव यांना सार्वकालिन एकादश संघाचाही कर्णधार बनवण्यात आले आहे. त्यांनी १९८३ सालच्या विश्वचषकात भारताकडून ८ सामने खेळत सर्वाधिक ३०३ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या सर्वाधिक नाबाद १७५ धावांचा समावेश होता. तसेच, गोलंदाजी करताना त्यांनी १२ विकेट्सही घेतल्या होत्या.
गोलंदाज –
रॉजर बिन्नी
१९८३ सालच्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज रॉजर बिन्नी हे होते. त्यांनी ८ सामन्यात १८.६६च्या सरासरीने १८ विकेट्स घेतल्या होत्या. यात त्यांच्या २९ धावा देत घेतलेल्या ४ विकेट्सच्या सर्वोत्तम कामगिरीचा समावेश होता. शिवाय, ६ डावात फलंदाजी करताना त्यांनी ७३ धावा केल्या होत्या.
वसीम अक्रम
पाकिस्तानचा गोलंदाज वसीम अक्रमने १९८३सालच्या विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने १० सामन्यात १८.७७च्या सरासरीने १८ विकेट्स घेतल्या होत्या. यासह संपूर्ण विश्वचषकात त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला होता.
झहीर खान
२०११सालच्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतील भारताचा गोलंदाज झहीर खान संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. त्याने ९ सामन्यात १८.७६च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याची सार्वकालिन एकादश संघात वेगवान गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
गौतम गंभीर म्हणतो; जर धोनी कर्णधार बनला नसता, तर त्याने केली असती ही गोष्ट…
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंडचे नेतृत्व करण्यास बेन स्टोक्स सज्ज






