---Advertisement---

कसोटीत तब्बल ३३० विकेट्स घेणाऱ्या ‘या’ दिग्गजाला सचिनविरुद्ध गोलंदाजी करणे जायचे अवघड

On: शनिवार, ऑगस्ट 21, 2021 8:05 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघात असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या कौशल्याच्या जोरावर केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट जगतात आपले नाव गाजवले. त्यातीलच एक म्हणजे भारताच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेला ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणजे सचिन तेंडुलकर. तेंडुलकरने भारताकडून खेळताना क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील केला आहे.

त्यामुळे अनेकदा गोलंदाजांना तेंडुलकरला गोलंदाजी करताना खूप विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागत असे. त्यातीलच एक म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज एलन डोनाल्ड. डोनाल्ड यांनी सचिनला सगळ्यात उत्कृष्ट टेक्निकल (फलंदाजीच्या तंत्रात पारंगत असलेला) फलंदाज मानले आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध तेंडुलकरची नेहमी चांगली खेळी राहिली होती. तेंडुलकरने दक्षिण आफ्रिका विरुद्ध १५ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ४६.४४ च्या सरासरीने ११६१ धावा केल्या होत्या. तसेच ४० एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८.२३ च्या सरासरीने १४५३ धावा केल्या होत्या.

त्यामुळेच डोनाल्ड यांना जेव्हा तुमच्यासाठी सर्वात कठीण फलंदाज कोण होता? असे विचारले असता त्यांनी सचिन तेंडुलकरचे नाव घेतले. यूट्यूबच्या ‘क्रिकेट लाईफ स्टोरीज’ या चॅनेलशी बोलताना ते म्हणाले, “मला नेहमीच असा प्रश्न विचारला जातो. म्हणून माझ्यासाठी ३ असे खेळाडू होते, ज्यांना मी वेगवेगळ्या विभागात ठेवेन. सचिन तेंडुलकर हा टेक्निकच्या बाबतीत अत्यंत उत्कृष्ट फलंदाज होता. त्यामुळे तो त्याच्या काळात इतर भारतीय खेळाडूंच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेच्या परिस्थितीशी लवकर सामावून घ्यायचा. तो नेहमी परिस्थितीनुसार आपल्या खेळण्याच्या टेक्निकमध्ये सुधारणा करत असत.”

त्याचबरोबर डोनाल्डने तेंडुलकर सोबतच ब्रायन लारा आणि स्टीव्ह वॉ यांना देखील उत्कृष्ट खेळाडू मानले. तेंडुलकर नंतर हेच दोन खेळाडू डोनाल्डला गोलंदाजी करण्यासाठी कठीण फलंदाज होते. याबाबत बोलताना डोनाल्ड म्हणाले, “तेंडुलकरनंतर लारा देखील एक उत्कृष्ट फलंदाज होता. तो कोणत्याही खेळपट्टीवर सहजपणे खेळायचा. त्याचे शॉट्स देखील अद्भुत असायचे. त्यानंतर स्टीव वॉ हादेखील सर्वात कठीण फलंदाज होता.”

दरम्यान, डोनाल्डने १९९१ साली दक्षिण आफ्रिका संघाकडून पदार्पण केले होते. त्यांनी एकूण ७२ कसोटी सामने खेळले होते, ज्यामध्ये त्यांनी ३३० विकेट्स घेतल्या. तर १६४ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी एकूण २७२ विकेट घेतल्या होत्या. तसेच त्यांना जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी विचारले असता. याबाबत काही सांगता येणे अवघड आहे असे सांगितले होते. मात्र त्याचबरोबर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी त्यांना प्रभावित केल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले होते.

महत्वाच्या बातम्या –
तालिबानच्या अधिकारानंतरही अफगाणिस्तानचे क्रिकेट सुरक्षित, माजी क्रिकेटपटूचा दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---