---Advertisement---

टीम इंडियाची आजपर्यंतची वनडेतील ऑल टाईम ११

---Advertisement---

भारतीय संघाने आत्तापर्यंत वनडेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताकडून वनडेत २३१ खेळाडू किमान १ तरी सामना खेळले आहेत. यातील अनेक खेळाडू आज क्रिकेटजगतात दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जातात. अनेक भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर मोठे विश्वविक्रम आहेत. त्यामुळे जर जगातील सर्वोत्तम ११ जणांचा वनडे संघ तयार केला तरी काही भारतीय क्रिकेटपटूंना त्यात स्थान मिळू शकते. पण या लेखात आपण भारताच्या सर्वोत्तम ११ खेळाडूंच्या वनडे संघाचा आढावा घेणार आहे.

सलामीवीर:  सचिन तेंडुलकर – सौरव गांगुली

वनडेमध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीने सलमीवीर म्हणून शानदार कामगिरी केली आहे. भारताकडून खेळताना वनडेत सचिन आणि गांगुली हे सर्वाधिक धावा करणारे सलामीवीर फलंदाज आहेत.

सचिनने वनडेत सलामीला खेळताना ३४४ वनडे सामन्यात ४८.२९ च्या सरासरीने १५३१५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४५ शतके आणि ७५ अर्धशतकांचा समावेश आहे. तर गांगुलीने २४२ वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी करताना ४१.५७ च्या सरासरीने १९ शतके आणि ५८ अर्धशतकांसह ९१४६ धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर संपूर्ण कारकिर्दीचा विचार करायचा झाला तर सचिन तेंडुलकरने  भारताकडून ४६३ वनडे सामन्यात ४९ शतके आणि ९६ अर्धशतकांसह १८४२६ धावा केल्या आहेत. तसेच गांगुलीने भारताकडून खेळताना ३०८ वनडे सामन्यात २२ शतके आणि ७१ शतकांसह १११२१ धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर सचिन आणि गांगुली यांनी १९६ डावात एकत्र फलंदाजी केली आहे. त्यांनी एकत्र फलंदाजी करताना ८२२७ धावांची भागीदारी केली आहे.

मधली फळी  : विराट कोहली, राहुल द्रविड आणि युवराज सिंग 

भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीने मधल्या फळीत खेळताना शानदार कामगिरी केली आहे. त्याची आता सर्वोत्तम फलंदाजांमध्येही गणना होती. त्याने वनडेमध्ये २४८ सामन्यात ५९.३३ च्या सरासरीने ४३ शतकांसह ११८६७ धवा केल्या आहेत.

त्यातील १८७ सामन्यात विराट तिसऱ्या क्रमांकावर खेळला आहे. तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर वनडेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. त्याने तिसऱ्या क्रमांकावर ६२.९० च्या सरासरीने ९७५१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३६ शतकांचा आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे.

मधल्या फळीत भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडही यशस्वी ठरला आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीतील बरेचशा सामन्यात मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. त्याने भारताकडून ३४० वनडे सामन्यात खेळताना ३९.१५ च्या सरासरीने १०७६८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १२ शतकांचा आणि ८२ अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच वनडेत दोन वेळा ३०० पेक्षा अधिक धावांच्या भागीदारी करण्यात द्रविडचा समावेश आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याने एकदा गांगुली तर एकदा सचिन बरोबर त्रिशतकी भागीदारी केली आहे.

मधल्या फळीतील भारताचा आणखी एक प्रतिभाशाली खेळाडू म्हणजे युवराज सिंग. अष्टपैलू खेळाडू युवराजने अनेकदा त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारताला विजय मिळवून दिला आहे. २०११ च्या विश्वचषकात तो मालिकावीर देखील ठरला होता. युवराजने त्याच्या वनडे कारकिर्दीत भारताकडून ३०१ सामने खेळताना ३६.४७ च्या सरासरीने १४ शतके आणि ५२ अर्धशतकांसह ८६०९ धावा केलल्या आहेत. तसेच त्याने ११० विकेट्सही घेतल्या आहेत.

यष्टीरक्षक : एमएस धोनी 

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी वनडेतील एक यशस्वी यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याने वनडेमध्ये भारताकडून खेळताना ३४७ वनडे सामन्यात ५०.२३ च्या सरासरीने ९ शतके आणि ७३ अर्धशतकांसह १०५९९ धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर तो वनडेत यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय यष्टीरक्षक आहे. त्याने भारताकडून यष्टीरक्षण करताना यष्टीमागे ४३८ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या ३१८ झेलांचा आणि १२० यष्टीचीतचा समावेश आहे.

अष्टपैलू क्रिकेटपटू: कपिल देव –

भारताचा पहिला विश्वचषक विजेता कर्णधार म्हणून कपिल देव यांना ओळखले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली १९८३ ला भारताने विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर कपिल यांना एक सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी भारताकडून २२५ वनडे सामने खेळताना १ शतक आणि १४ अर्धशतकांसह ३७८३ धावा केल्या आहेत. तसेच २५३ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्यांनी १ वेळा एका वनडेत ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

फिरकीपटू: अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग

भारताच्या फिरकी गोलंदाजीचा विचार केला तर सर्वात यशस्वी हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे हे फिरकीपटू ठरले आहेत. भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या फिरकी गोलंदाजांमध्ये कुंबळे अव्वल क्रमांकावर तर हरभजन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कुंबळेने वनडेत भारताकडून २६९ सामन्यात गोलंदाजी करताना ३३४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २ वेळा एका सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच हरभजन सिंगने भारताकडून २३४ वनडे सामन्यात गोलंदाजी करताना २६५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ३ वेळा एका सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

वेगवान गोलंदाज – जवागल श्रीनाथ आणि झहिर खान 

भारताकडून वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर जवागल श्रीनाथ आहे. श्रीनाथने भारताकडून २२९ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३ वनडे सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच त्याने ३१५ विकेट्स वनडेत घेतल्या आहेत.

भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अजित अगरकर आहे. परंतू झहिर खान डावकरी असल्याने जास्त प्रभावी ठरु शकतो. तसा अगरकर आणि झहिर यांच्या कामगिरीमध्ये खूप फरक नाही. अगरकरने भारताकडून १९१ वनडे सामन्यात २८८ विकेट्स घेतल्या आहेत. तर झहिरने १९४ सामन्यात २६९ विकेट्स घेतल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी – 

ऑक्टोबरमध्ये टी२० विश्वचषकाऐवजी होणार आयपीएल?

या कारणामुळे मास्टर ब्लास्टर साजरा करणार नाही वाढदिवस

केवळ २ वेळा कसोटीत फिरकीपटूंनी टाकल्या होत्या पहिल्या २ ओव्हर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---