मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुर्यकुमार यादव याची आगामी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तो अनेक दिवसांपासून भारतीय संघाचे दार ठोठावत होता. पण अखेर त्याला भारतीय संघात संधी मिळाल्याने त्याचे स्वप्न पूर्ण झाले. याबद्दल त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिलेल्या मुलाखतीत सुर्यकुमारने भारतीय संघात निवड झाल्यानंतर कशा भावना होत्या. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळण्याबद्दल काय भावना आहेत, याबद्दल खुलासा केला आहे.
संघात निवड झाल्याचे कळताच डोळ्यात आले अश्रू
संघात निवड झाल्यानंतरच्या प्रतिक्रियेबद्दल सुर्यकुमार म्हणाला, ‘मी खुप उत्सुक होतो. मी माझ्या खोलीत बसून चित्रपट बघण्याचा प्रयत्न करत होतो आणि माझ्या फोनवर नोटीफिकेशन आले की माझी इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मी माझे नाव पाहून रडायला लागलो. मी माझ्या पालकांना, पत्नीला आणि माझ्या बहिणीला फोन केला. आम्ही व्हिडिओ कॉलवर बोललो आणि एका क्षणी आम्ही सगळेच रडायला लागलो.’
पुढे सुर्यकुमार म्हणाला, ‘माझ्याबरोबर त्यांनीही माझे हे स्वप्न जगले आहे. हा दीर्घ प्रवास होता आणि ते असे लोक आहेत, जे या संपू्र्ण प्रवासात माझ्याबरोबर होते. त्यामुळे त्यांना आनंदी पाहाताना आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहाताना खुप छान वाटले.’
‘विराटच्या नेतृत्वाखाली खेळणे हे माझे स्वप्न होते’ – सुर्यकुमार
विराटच्या नेतृत्वाखाली खेळण्याबद्दलच्या भावनांबद्दल विचारले असता सुर्यकुमार म्हणाला, ‘पहिली गोष्ट म्हणजे मी संघाबरोबर चांगला वेळ घालवण्यासाठी आणि अहमदाबादला पोहचल्यानंतर त्या वातावरणाशी जुळवून घेण्यास उत्सुक आहे. मी खुप काळापासून विराटच्या नेतृत्वाखाली खेळण्याचे स्वप्न पाहात आहे. मी विराटकडून लवकरात लवकर शिकून घेण्यास उत्सुक आहे, जेणेकरुन मी आणखी चांगला खेळाडू बनू शकेल.’
सुर्यकुमार पुढे म्हणाला, ‘मी इंडियन प्रीमीयर लीगमध्ये (आयपीएल) त्याच्याविरुद्ध खेळलो आहे. भारताकडून खेळताना एवढे यश मिळवल्यानंतरही त्याची मैदानात जी उर्जा असती ती कौतुकास्पद असते. मी त्याला मैदानात स्वत:ला नेहमी उत्तेजित करताना पाहिले आहे. विजय मिळवण्यासाठीचा त्याचा दृष्टीकोन हा शिकण्यासारखा आहे.’
त्याचबरोबर हार्दिक पंड्याकडून विराटबद्दल जाणून घेतल्याचे सांगताना सुर्यकुमार म्हणाला, ‘मी गेल्या काही वर्षापासून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. मला विराटबद्दल अनेक गोष्टी हार्दिक पंड्याकडून ऐकायला मिळाल्या आहेत. जेव्हा आम्ही एकत्र असतो, तेव्हा मी हार्दिकला विचारत असतो की विराट सराव सत्रात वेगळे असे काय करतो. हार्दिकनेही मला सांगितले की विराट वेगळ्याप्रकारे सराव करतो. त्याची सरावातील उर्जा, मग ती फलंदाजीसाठी असो किंवा क्षेत्ररक्षणासाठी, ती मैदानातही सारखीच असते. या अशा गोष्टी आहेत, ज्या मला त्याच्याकडून शिकायच्या आहेत.’
सुर्यकुमार सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत होता. आता तो लवकरच अहमदाबादला टी२० मालिकेसाठी रवाना होईल.
सुर्यकुमार कारकिर्द –
सुर्यकुमारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७७ सामन्यात ४४च्या सरासरीने ५३२६ धावा केल्या आहेत. अ दर्जाच्या ९७ सामन्यात त्याने ३६.८२च्या सरासरीने २६६८ धावा केल्या आहेत तर ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात त्याने १७० सामन्यात ३१.५६ च्या सरासरीने ३५६७ धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये १०१ सामने खेळलेल्या सुर्यकुमारने ३०.२० च्या सरासरीने २०२४ धावा केल्या आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडियवर होणार सर्व सामने –
भारत विरुद्ध इंग्लंड संघात होणारे सर्व ५ टी२० सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. या मालिकेला १२ मार्चपासून सुरुवात होणार असून १४, १६, १८ आणि २० मार्चला अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा सामना खेळला जाणार आहे.
टी२० मालिकेसाठी भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या –
चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात होणार ‘हे’ बदल, उमेश यादवला संधी मिळण्याची दाट शक्यता
भारत-इंग्लंड सामन्यांच्या लाईव्ह शो दरम्यान अनेकांना घायाळ करणारी कोण आहे किरा नारायणन, घ्या जाणून