सध्या न्यूझीलंडमध्ये महिला क्रिकेट विश्वचषक (Womens Cricket World Cup 2022) खेळला जात आहे. त्याचवेळी, ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट (Australia Tour Of Pakistan) संघात तब्बल दोन तपांच्या कालावधीनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. मंगळवारी (८ मार्च) विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (AUSvPAK) असा सामना रंगला. तर, पाकिस्तानात रावळपिंडी येथे पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशीचा खेळ खेळला गेला. हजारो किलोमीटर अंतर असलेल्या या दोन्ही सामन्यादरम्यान एक गोष्ट अशी घडली त्यामुळे हा दिवस संस्मरणीय ठरला.
पती पत्नीची जोडी एकाच प्रतिस्पर्धी विरोधात मैदानावर
न्यूझीलंड येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिलीने (Alyssa Healy) शानदार कामगिरी केली. सलामीला फलंदाजीला येत तिने ७९ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात पाकिस्तान संघाला ७ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय तर पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव आहे.
त्यावेळी पाकिस्तानात रावळपिंडी येथे ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) हा मैदानावर गोलंदाजी करत होता. हिली आणि स्टार्क पती-पत्नी आहेत. त्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या मैदानांवर एकाच प्रतिस्पर्ध्याविरूद्ध पती-पत्नीने मैदानात उतरण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ ठरली.
शानदार राहिली आहे कारकीर्द
एलिसा हिली ही ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक इयान हिली यांची पुतणी आहे. स्टार्क व एलिसा लहानपणापासून एकाच शाळेत शिकले होते. २०१५ मध्ये दोघांनी साखरपुडा केलेला. यानंतर एका वर्षांनी ते विवाहबंधनात अडकले. ३१ वर्षीय एलिसा ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची महत्त्वपूर्ण सदस्य मानली जाते . तिने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत ७६ वनडे सामने खेळताना १,७७२ धावा केल्या आहेत. तसेच, ११६ टी२० सामन्यात तिने २,१०० पेक्षा अधिक धावा जमविल्या आहेत. मिचेल स्टार्क अनेकदा तिला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात हजर असतो. २०२१ यावर्षीचे सर्वोत्कृष्ट ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पुरस्कार या दोन्ही खेळाडूंना आपापल्या गटात मिळाले होते.
महत्वाच्या बातम्या-