ऑस्ट्रेलियामध्ये सध्या महिला बिग बॅश लीग म्हणजेच बीबीएल स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेतील ५५ वा सामना सिडनी येथे रविवारी (२२ नोव्हेंबर) सिडनी सिक्सर्स विरुद्ध मेलबर्न स्टार्स या महिला संघात झाला. या सामन्यात सिडनी सिक्सर्स संघाची धडाकेबाज फलंदाज आणि वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कची पत्नी एलिसा हिलीने ४८ चेंडूत तडाखेबंद शतकी खेळी केली. तिने शतक करताच स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्या स्टार्कनेही या खेळीचा आनंद लुटला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून सिडनी संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत मेलबर्नला फलंदाजीस आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना मेलबर्न संघाने ४ विकेट्स गमावत १७८ धावा केल्या. या धावांचे आव्हान सिडनी संघाने ५ विकेट्स गमावत १८५ धावा करत पूर्ण केले.
यादरम्यान सिडनी संघाकडून खेळताना हिलीने ५२ चेंडूत १११ धावांची अफलातून खेळी केली. या धावा कुटताना तिने ५ षटकार आणि १५ चौकारांचा पाऊस पाडला. बीबीएलमधील हिलीचे हे ४ थे शतक होते.
हिलीसाठी हा दिवस खूपच खास ठरला. कारण तिने आपल्या पतीच्या उपस्थितीत शतक ठोकले.
हिलीने शतक ठोकल्यानंतर स्टेडिअममध्ये बसलेला स्टार्क टाळ्या वाजवताना दिसला. यादरम्यानचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
HEALY HUNDRED!
She brings up a superb century off just 48 balls. What a legend #WBBL06 pic.twitter.com/ftTQwCcpIq
— Weber Women's Big Bash League (@WBBL) November 22, 2020
https://twitter.com/sbhos10/status/1330408144988762112
हिलीने आतापर्यंत बीबीएलमध्ये सिडनी संघाकडून ८७ सामने खेळले आहेत. त्यात तिने २९.४५ च्या सरासरीने २४१५ धावा केल्या आहेत. या धावा करताना तिने ४ शतके आणि १२ अर्धशतके केली आहेत. विशेष म्हणजे या सिडनीकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला फलंदाजांमध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर एलिसा पेरी आहे. तिने ३००२ धावा केल्या आहेत.