पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत फायनलमध्ये पोहोचू शकला नाही. अमनला उपांत्य फेरीत जपानच्या कुस्तीपटूकडून अवघ्या 1 मिनिट 14 सेकंदात पराभवाला सामोरं जावं लागलं. यासह अमनच्या आजच मेडल पक्क करण्याच्या आशा धुळीला मिळाल्या. मात्र असं असतानाही त्याला कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे.
सेमीफायनमध्ये अमनचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा कुस्तीपटू जपानच्या रे हिगुचीशी होता. त्यानं एकही गुण न गमावता अमनचा 10-0 असा पराभव केला. अमननं सुरुवातीच्या फेरीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यानं 3 वेळच्या विश्वविजेत्याला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली होती. मात्र उपांत्य फेरीत तो विजय मिळवू शकला नाही. हिगुचीनं 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. याशिवाय, गेल्या वर्षीच त्यानं जागतिक स्पर्धेतही रौप्यपदक जिंकलं होतं.
हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातून आलेल्या 21 वर्षीय अमन सेहरावतचं हे पहिलंच ऑलिम्पिक आहे. पदार्पणाच्या स्पर्धेतच या तरुण कुस्तीपटूनं दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली. त्यानं आपल्या पहिल्या दोन्ही लढती 10-0 ने जिंकल्या. सर्वप्रथम त्यानं नॉर्थ मॅसेडोनियाच्या व्लादिमीर एगोरोव्हचा 3 मिनिटे 59 सेकंदात पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यानंतर अमननं उपांत्यपूर्व फेरीत अल्बेनियाच्या झेलीमखान अबाकारोव्हचा अवघ्या 3 मिनिटे 56 सेकंदात पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
अमन सेहरावतचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पोहोचण्याचा प्रवासही खूप दमदार होता. त्यानं राष्ट्रीय चाचण्यांमध्ये दिग्गज कुस्तीपटू रवी दहिया पराभव करून ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं होतं. रवी दहियानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं.
हेही वाचा –
विनेशला पदक मिळणार की नाही? पॅरिसमध्ये होणार सुनावणी, कोर्टानं अपील स्वीकारलं
भारतीय संस्कार दाखवत श्रीजेशने जिंकली लाखो मने, विजयानंतर केलेली कृती चर्चेत
व्वाह..! भारताने हॉकीचे कांस्यपदक कोणाला केले समर्पित? नाव ऐकून वाटेल अभिमान