पुणे । अनन्या गाडगीळ हिने पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन आयोजित अमनोरा कप बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले. अनन्याने स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुली आणि १५ वर्षांखालील मुलींच्या गटातील एकेरीचे विजेतेपद मिळवले.
पीवायसी हिंदू जिमखानाच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीतील अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित अनन्याने आंचल जैनवर २१-१९, २१-११ अशी मात केली. यानंतर अनन्याने १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीतील अंतिम फेरीत चौथ्या मानांकित रिद्धी पुडकेवर २१-१४, २१-१४ असा २९ मिनिटांत विजय मिळवला आणि दुहेरी यश मिळवले.
अनन्या हि अरण्येश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिकते. नीता केळकर यांच्याकडे ती बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहे.
महेश, नुपूर, मानसीला दुहेरी मुकुट
या स्पर्धेत महेश उतगिकर, नुपूर सहस्त्रबुद्धे, मानसी गाडगीळ, समीर भागवत, हर्षद भागवत यांनीही दुहेरी मुकुट पटकावला. महेश उतगिकरने ४० वर्षांखालील पुरुष दुहेरी आणि ४० वर्षांखालील मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवले. स्पर्धेतील ४० वर्षांखालील पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत महेश-अमित देवधर या अग्रमानांकित जोडीने महेश कुलकर्णी-विक्रांत पाटील या जोडीवर २१-९, २१-८ अशी मात केली.
यानंतर मिश्र दुहेरीत महेश उतगिकर-चैत्राली नव्हरे जोडीने अर्जुन भगत-प्रेरणा जोशी जोडीवर २१-५, २१-१५ असा विजय मिळवला. नुपूर सहस्त्रबुद्धेने महिला दुहेरी आणि ३० वर्षांखालील मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवले. महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत नुपूर सहस्त्रबुद्धे-मानसी गाडगीळ या अग्रमानांकित जोडीने आदिती काळे- रिया जाईल या दुसऱ्या मानांकित जोडीवर २१-१८, २१-१४ असा विजय मिळवला. यानंतर मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत नुपूरने समीर भागवत यांच्या साथीने केदार नागमोडे-दीप्ती सरदेसाई जोडीवर २१-११, २१-९ अशी मात केली. मानसी गाडगीळने महिला दुहेरीच्यापाठोपाठ मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवले. तिने मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत समीर भागवतसह खेळताना अजित कुंभार-रिया जाईल जोडीवर २१-१८, २१-१५ अशी मात केली.
हर्षद भागवतने ३० वर्षांखालील पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले. ३० वर्षांखालील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चौथ्या मानांकित हर्षद भागवतने जयंत पारखीवर २१-१४, २१-९ अशी मात केली. यानंतर दुहेरीच्या अंतिम फेरीत हर्षद भागवत-अजित उमराणी जोडीने केदार नाडगोंडे-तेजस किंजवडेकर जोडीवर २१-८, २१-१० अशी मात केली.
निकाल : १३ वर्षांखालील मुली – उपांत्य फेरी – आंचल जैन वि. वि. संजना अंबेकर २१-१८, २१-९; अनन्या गाडगीळ वि. वि. सानिका पाटणकर २१-१९, २१-११.
१५ वर्षांखालील मुली – उपांत्य फेरी – रिद्धी पुडके वि. वि. सानिका पाटणकर २१-१८, २५-२३; अनन्या गाडगीळ वि. वि. सायली फाटक २१-१०, २१-१५.
४० वर्षांखालील पुरुष एकेरी – अंतिम फेरी – महेश कुलकर्णी वि. वि. दिगांत गुप्ता २५-२३, २१-१८.
४० वर्षांखालील महिला एकेरी – अंतिम फेरी – दिपाली जोशी वि. वि. संजना भारती २१-८, २१-५.
५० वर्षांखालील पुरुष एकेरी – अंतिम फेरी – अजय भागवत वि. वि. अवधूत जोशी २१-१५, २१-८.
पुरुष दुहेरी – अंतिम फेरी – नरेंद्र गोगावले – विनित कांबळे वि. वि. अजित उमराणी-हर्षद भागवत २१-१३, २१-११.