मुंबई:- अंकुर स्पोर्टस्, विजय क्लब, बंड्या मारुती या मुंबईच्या संघा बरोबर पुण्याच्या चांदेरे फाऊंडेशनने अमरहिंद मंडळाने आयोजित केलेल्या पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. लायन्स स्पोर्टस् विरुद्ध अंकुर स्पोर्टस् आणि बाबुराव चांदेरे फाऊंडेशन विरुद्ध बंड्या मारुती मंडळ अशा उपांत्य लढती होतील. त्यानंतर अंतिम सामना होईल. दादर, गोखले रोड(प.) येथील मंडळाच्या पटांगणातील मॅट वर सुरू असलेल्या स्व. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धेच्या चौथ्या दिवशी उपउपांत्य सामन्यात मुंबईच्या अंकुरने मुंबईच्या ओम् पिंपळेश्वर संघावर ५३-२१ अशी सहज मात केली. पूर्वार्धातच दोन लोण देत २७-०८अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या अंकुरने नंतर सावध केलं करीत प्रथम उपांत्य फेरी गाठली.
अंकुरच्या या विजयात सुशांत साईलने २८ चढाया करीत २२ गुण मिळविले. त्याची एकदाही पकड झाली नाही. त्याने २ पकडी देखील केल्या. त्याला अभिमन्यू पाटीलने १२ चढायात ४ गुण घेत, तर जमीर शेखने ४ पकडी करीत छान साथ दिली. ओम् पिंपळेश्वरच्या शुभम साटम, मयुरेश चव्हाण यांनी उत्तरार्धात थोडा फार प्रतिकार केला. पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती. पुण्याच्या चांदेरे फाऊंडेशनने मुंबईच्या विजय क्लबचा प्रतिकार ४०-२८ असा मोडून काढला. सुरुवातीपासून गुण घेण्याचा सपाटा लावत सलग गुण घेत पुणेकरांनी मुंबईकरांवर लोण देत ९-० अशी आघाडी घेतली. पुन्हा ३ गुण घेत आपली आघाडी १२-०० अशी वाढविली. त्यानंतर विजयने पकड करीत गुणांचे खाते उघडले. पहिल्या डावात २४-०८ अशी भक्कम आघाडी चांदेरे संघाकडे होती. त्यानंतर विजय क्लबने आपल्या आक्रमणाची धार वाढवीत चांदेरे संघावर लोण देत ही आघाडी १७-२९अशी कमी केली. शेवटची ५मिनिटे पूकारली तेव्हा ३५-२३ अशी पुण्याकडे आघाडी होती. शेवटी १२ गुणांच्या फरकाने त्यांनी विजय मिळविला. पुणेकरांच्या या विजयात अजित चौहानने १९ चढायात ३ बोनस सह ८ झटापटीचे असे ११ गुण मिळवित महत्वाचा वाटा उचलला. त्याला तेजस काळभोरने १० चढायात ५ गुण घेत,तर निखिल ससारने ३ पकडी करीत उत्तम साथ दिली. दुसऱ्या डावात विजयच्या अजिंक्य कापरेला सुर सापडला. त्याने २१ चढाया करीत ८+१ असे ९ गुण घेतले. पण ७वेळा त्याची पकड झाली. राज नाटेकरने १८ चढायात ६+१ असे ७ गुण मिळवित त्याला छान साथ दिली. पण विजयापासून ते दूरच राहिले.
तिसऱ्या सामन्यात मुंबईच्या लायन्स क्लबने रायगडच्या मिड लाईनचा ३९-२० असा लीलया पाडाव केला. पहिल्या सत्रात लोण देत २७-०७ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या लायन्सने दुसऱ्या सत्रात संयमी खेळ करीत आपला विजय साकारला. लायन्सच्या या विजयात राज आचार्यने अष्टपैलू खेळ करत १९ चढाया केल्या. त्यात ११ झटापटीचे व ३ बोनस असे १४ गुण मिळविले. २ पकडी देखील त्याने केल्या. एक वेळ त्याची पकड झाली. त्याला विशाल फरकटेने ४ गुण आणि २पकडी करीत उत्कृष्ट साथ दिली. एक वेळा त्याची पकड झाली. मिड लाईन कडून अनिकेत म्हात्रे, वैभव पाटील यांनी विश्रांतीनंतर बऱ्या पैकी लढत दिली. शेवटच्या सामन्यात मुंबईच्या बंड्या मारुतीने ठाण्याच्या विजय स्पोर्टस् क्लबचा प्रतिकार ४१-३७ असा मोडून काढला. मध्यांतराला २७-१०अशी आघाडी घेणाऱ्या लायन्सला नंतर मात्र विजयने विजयासाठी चांगलेच झुंजविले. प्रणित देसाई, शुभम चौगुले, ऋतिक पाटील बंड्या मारुतीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. विजय स्पोर्टस् कडून प्रतीक पाटील, धीरज खारपाटील, राहुल पाटील यांनी उत्तरार्धात कडवी लढत देत सामना रंगदार अवस्थेत आणला. पण पूर्वार्धातील मोठ्या आघाडीमुळे बंड्या मारुतीला विजय मिळविता आला. या अगोदर झालेल्या उप उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लायन्स स्पोर्टस् ने श्रीराम संघाला ५०-३५ असे तर विजय क्लबने गोलफादेवीचा ४९-२६ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.
महत्वाच्या बातम्या –
Sania Mirza । घटस्फोटाबाबत सानियाकडून पहिलीच प्रतिक्रिया! शोएबला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा?
इंग्लंडला तगडा झटका! कसोटी मालिकेपूर्वी धडाडीचा फलंदाज मायदेशी परतला, वाचा काय आहे कौटुंबीक कारण