भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर ते स्वप्न साकार केलं, जे दोन दशकांपासून अपूर्ण राहिलं होतं. दक्षिण आफ्रिकेवर अंतिम सामन्यात मात करत भारताने महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 जिंकत इतिहास रचला. या विजयामागे खेळाडूंची झुंज, त्यांची समर्पणभावना आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या अचूक रणनीतीचा मोठा वाटा होता.
मुझुमदार हे नाव भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी नवं नाही. देशांतर्गत क्रिकेटमधील हजारो धावा, डझनभर विक्रम, पण तरीही भारतीय संघात एकदाही संधी नाही. हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वात मोठा ‘अनफेअर रनआऊट’ होता. मात्र नियतीने त्यांना दुसऱ्या मार्गाने न्याय दिला. प्रशिक्षक म्हणून त्यांनी भारतीय महिला संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिलं.
स्पर्धेच्या सुरुवातीला तीन सामने गमावल्यानंतर संघावर टीका झाली होती. पण मुझुमदार यांच्या शांत नेतृत्वाने आणि आत्मविश्वासाने टीम इंडिया पुन्हा उभी राहिली. त्यांनी खेळाडूंमध्ये ‘विश्वास’ आणि ‘संघभावना’ची नवी ऊर्जा निर्माण केली. उपांत्य आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाने दाखवलेली जिद्द त्यांच्या मार्गदर्शनाचं प्रत्यंतर होती.
फायनलपूर्वी अमोल मुझुमदार यांनी खेळाडूंना दिलेलं भाषण आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. त्यांच्या शब्दांनी प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे केले. त्यांनी म्हटलं – “पुढील सात तास, मनातील सगळा गोंधळ दूर ठेवा. जगाशी संपर्क तोडून स्वतःभोवती एक बबल तयार करा. त्या बबलमध्ये प्रवेश करा आणि विजयाशिवाय बाहेर येऊ नका. आज आपण स्वतःची कहाणी लिहणार आहोत- दुसऱ्यांच्या प्रेरणा नाही, आज प्रेरणा तुम्हीच व्हायचं आहे. चला, इतिहास घडवूया!”
हे केवळ भाषण नव्हतं, तर एका ‘अपुरी राहिलेल्या क्रिकेट कहाणीचा’ पुनर्जन्म होता. मैदानावर मुलींनी इतिहास घडवला आणि अमोल मुझुमदार यांनी आपल्या आयुष्याच्या पानावर शेवटी ‘विजय’ लिहिला.






