सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक नवनवीन प्रतिभावंत महिला क्रिकेटपटू समोर येताना दिसत आहेत. आयर्लंड येथे आयर्लंड महिला क्रिकेट संघ व झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ यांच्यादरम्यान वनडे मालिका खेळली गेली. मालिकेतील अखेरच्या सामन्यात आयर्लंड संघाची सर्वात युवा फलंदाज एमी हंटर हिने शानदार शतकी खेळी करत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. तिने शतक झळकावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकवणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला.
एमी हंटरचा विश्वविक्रम
बेलफास्ट येथे खेळल्या गेलेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या हंटर हिने १२१ धावांची खेळी केली. यासह ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकवणारा क्रिकेटपटू ठरली. तिने आपल्या सोळाव्या वाढदिवशीच ही कमाल करून दाखवली. महिला क्रिकेटमध्ये यापूर्वी हा विक्रम भारतीय संघाची कर्णधार मिताली राजच्या नावे होता. तीने जून १९९९ मध्ये सोळा वर्ष व २२५ दिवस इतके वय असताना ही कामगिरी केली होती. पुरुष क्रिकेटमध्ये हा कारनामा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्या नावे असून, त्याने १६ वर्ष व २१७ दिवस इतके वय असताना आंतरराष्ट्रीय वनडे शतक ठोकले होते.
आयर्लंडचा मालिका विजय
बेलफास्ट येथे खेळल्या गेलेल्या चार सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात आयर्लंड संघाने हंटरच्या शतकाच्या जोरावर ३२३ धावा उभारल्या होत्या. प्रत्युत्तरात, झिम्बाब्वेला हे आव्हान पार करण्यात ८५ धावांनी अपयश आले. हंटर हिला सामन्याची तर, गॅबी लुईसला मालिकेची मानकरी निवडले गेले. या विजयासह आयर्लंडने मालिका ३-१ अशी खिशात घातली.






