वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी भारताचा उदयोन्मुख अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीनं संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यानं जगातील सर्वात प्रसिद्ध आणि आयकॉनिक स्टेडियमपैकी एक असलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्धच्या कारकिर्दीतील अवघ्या चौथ्या कसोटीत शतक झळकावलं. नितीशनं मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. या कामगिरीचं बक्षिस आता त्याला मिळालं आहे.
वास्तविक, आंध्र क्रिकेट असोसिएशननं नितीश कुमारला 25 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. आंध्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि खासदार केसिनेनी शिवनाथ यांनी ‘एक्स’ वर एका पोस्टमध्ये नितीशचं अभिनंदन केलं. या कामगिरीसाठी त्याला संघटनेकडून 25 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल, असं त्यांनी जाहीर केलं. त्यांनी लिहिलं की, त्याची ही कामगिरी लाखो तरुणांना पुढे जाण्यासाठी आणि उंची गाठण्यासाठी प्रेरणा देईल.
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीत नितीशनं शानदार कामगिरी केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या 6 विकेट्स गेल्यानंर तो क्रीजवर आला. येथून त्यानं वॉशिंग्टन सुंदरसोबत उत्कृष्ट भागीदारी करत टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढलं.
नितीशनं या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावरच कसोटी पदार्पण केलं आहे. पर्थ कसोटीत त्यानं कारकिर्दीची सुरुवात केली आणि पहिल्या डावात सर्वाधिक 41 धावा केल्या. दुसऱ्या डावातही त्यानं 38 धावांची झटपट नाबाद खेळी खेळली होती. त्यानंतर ॲडलेड कसोटीतही दोन्ही डावात त्याच्या बॅटमधून 42-42 धावा आल्या.
मेलबर्न कसोटीबद्दल बोलायचं झालं तर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तो 105 धावांवर नाबाद आहे. आतापर्यंत नितीशनं या मालिकेतील 6 डावात 284 धावा केल्या असून तो भारतासाठी या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
हेही वाचा –
सामन्यानंतर नितीश रेड्डी कुटुंबासोबत, बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ
नितीश आणि वॉशिंग्टनने रचला विक्रम, 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं
पोराला क्रिकेटर बनवण्यासाठी बापाने नोकरी सोडली! जाणून घ्या नितीश रेड्डीचा अंडर-14 पासून मेलबर्नपर्यंतचा प्रवास