साल २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिजावर टी२० क्रिकेटचा उदय झाल्यावर पुढच्या काही वर्षांतच क्रिकेटच्या या सगळ्यात लहान स्वरूपाची लोकप्रियता झपाट्याने वाढली. २००७ सालापासून सुरू झालेल्या टी२० विश्वचषकाने तर त्याला हातभार लावलाच. मात्र २००८ पासून सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमुळे टी२० क्रिकेटच्या इतिहासातील नवा अध्याय रचला. या टी२० लीगची लोकप्रियता पाहून त्याच धर्तीवर जगभरात कॅरेबियन प्रीमियर लीग, बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग अशा अनेक टी२० लीग सुरू झाल्या.
मात्र या इतर लीगनी आव्हान दिल्यानंतर देखील आयपीएलच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली नाही. त्यामुळे जगभरातील खेळाडूंची आणि चाहत्यांची देखील सर्वोत्तम टी२० लीग म्हणून आयपीएललाच पसंती असते. मात्र स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने नुकतेच एक धक्कादायक वक्तव्य केले असून त्याने आयपीएल जगातील सर्वोत्तम लीग नसल्याचे म्हंटले आहे. याशिवाय त्याने बायो बबलमुळे निर्माण होणार्या समस्यांवर देखील भाष्य केले आहे.
आयपीएल नाहीतर ‘ही’ लीग आहे सर्वोत्तम
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून खेळतो. याशिवाय बिग बॅश, पाकिस्तान सुपर लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग अशा इतर टी२० लीगमध्ये देखील तो भाग घेत असतो. यातील त्याच्या मते सर्वोत्तम लीग कोणती, असा प्रश्न विचारला असता रसेल म्हणाला, “मी जगभरातील अनेक टी२० लीग खेळलो आहे. यात मला आयपीएल नाही तर पाकिस्तान सुपर लीग सर्वोत्तम आहे, असे वाटते. पाकिस्तान सुपर लीगमध्ये उच्च गुणवत्ता असलेले गोलंदाज आहेत. त्यामुळेच इतर लीगपेक्षा ही लीग माझ्यामते श्रेष्ठ आहे.”
बायो बबलवर केले भाष्य
आंद्रे रसेलने यावेळी बायो बबल बाबत देखील भाष्य केले. गेले वर्षभर कोरोना महामारीमुळे सगळया क्रीडा स्पर्धा बायो बबल मध्ये अर्थात जैव सुरक्षित वातावरणात खेळवल्या जात आहेत. मात्र याचा मानसिक स्थितीवर परिणाम होत असल्याचे विधान रसेलने केले. “मला वाटते आहे की बायो बबलचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो आहे. इतर खेळाडू किंवा प्रशिक्षकांना देखील याचा त्रास होतो आहे की नाही, याबाबत मी भाष्य करु शकणार नाही. पण माझ्यावर परिणाम होतो आहे हे निश्चित. एका बायो बबल मधून दुसरीकडे जाणे, हॉटेल रूममध्ये बंद असणे, कुठेही बाहेर न पडणे, लोकांमध्ये न मिसळणे, हे सगळेच वेगळे आहे. त्यामुळे याचा निश्चितच परिणाम होतो आहे”, असे मत यावेळी रसेलने व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीचा वारसा पुढे चालवण्यासाठी सज्ज आहे झारखंडचा हा युवा यष्टीरक्षक
परदेशी खेळाडूंना मोठा झटका! उर्वरित आयपीएलला नकार दिल्यास बीसीसीआय करणार ही कारवाई
दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांची ऑक्सिजन पातळी खालावली, आयसीयूमध्ये केले दाखल