सध्या भारत आणि इंग्लंडच्या संघांमधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सध्या चेन्नईच्या मैदानावर खेळवला जातो आहे. सामन्याचा तिसरा दिवस संपला असून भारतीय संघाने या सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या डावात १९५ धावांची आघाडी मिळवल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने २८६ धावा उभारल्या. त्यासह इंग्लंडला चौथ्या डावात ४८२ धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारताला या मजबूत स्थितीत आणून ठेवण्यात महत्वाचा वाटा उचलला तो आर अश्विनने. पहिल्या डावात गोलंदाजी करतांना पाच बळी मिळवत अश्विनने इंग्लंडला १३४ धावांवर रोखण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र त्यानंतर दुसऱ्या डावात शतक झळकवत फलंदाजीतही आपली कमाल दाखवली. अश्विनच्या या शतकानंतर ट्विटरवर एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा रंगते आहे.
खेळपट्टीवरुन होणाऱ्या टीकेला सडेतोड प्रत्युतर
दुसऱ्या सामन्यासाठी चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल आहे. पहिल्या दिवसापासूनच या खेळपट्टीवर चेंडूला फिरकी आणि उसळी मिळते आहे. हे पाहून इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसनने नाराजी व्यक्त केली होती. तसेच भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानेच सामन्यात वर्चस्व निर्माण केले आहे, अन्यथा या सामन्यातही भारताचा पराभव झाला असता, असे विधान केले होते. म्हणजेच सामन्याच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवशी या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अतिशय अवघड आहे, असा त्याच्या विधानाचा आशय होता.
https://twitter.com/KP24/status/1360874504256372739
मात्र आर अश्विनने याच खेळपट्टीवर फलंदाजी कशी करावी याचा उत्तम वस्तुपाठ घालून दिला. फलंदाजीसाठी खेळपट्टी अवघड असली तरी अशक्य नक्कीच नाही, हे अश्विनने दाखवून दिले. त्यामुळे आता पीटरसनला तसेच खेळपट्टीला नावे ठेवणाऱ्या इतरांना अश्विनने चोख प्रत्युतर दिल्याचा मतप्रवाह ट्विटरकरांमध्ये आहे. विशेष म्हणजे इंग्लंडच्याच अँड्र्य् फ्लिन्टॉफने पीटरसनचा उल्लेख न करता याच आशयाचे ट्विट केले आहे. त्याने ट्विट करताना म्हंटले की, “अश्विनने खेळपट्टीबाबतच्या सगळ्याच प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.”
Think @ashwinravi99 has answered all the questions regarding the pitch 👏🏼👏🏼👏🏼 https://t.co/ltRk5Rc6ld
— Andrew Flintoff (@flintoff11) February 15, 2021
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला आहे. चौथ्या डावात ४८२ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य मिळालेल्या पाहुण्या संघाने तिसऱ्या दिवसाखेरच ३ गडी गमावून ५३ धावा केल्या आहेत. डॅनियल लॉरेन्स १९ धावांवर तर कर्णधार जो रूट २ धावांवर खेळत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
भावा जिंकलंस रे जिंकलंस..! शतक झालं अश्विनचं पण सेलिब्रेशन केलं सिराजने