इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेचा मेगा लिलाव (IPLl 2022 Mega Auctions) येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. हा लिलाव बेंगलोरमध्ये पार पडणार आहे. बीसीसीआयने (BCCI) ५९० खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये २२० परदेशी आणि ३७० भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावासाठी सर्व संघांचे प्रतिनिधी बेंगलोरमध्ये जमा होत आहेत. आयपीएल २०२२ पासून आयपीएलमध्ये समाविष्ट होणाऱ्या लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Supergiants) संघाचे मुख्य प्रशिक्षक ऍण्डी फ्लॉवर यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.
भारतात आले फ्लॉवर
ऍण्डी फ्लॉवर हे क्रिकेट जगतातील एक मान्यवर प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. सध्या ते पाकिस्तान सुपर लीगमध्ये गतविजेत्या मुलतान सुल्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. मात्र, त्यांनी आयपीएल मेगा लिलावात सहभागी होण्यासाठी मुलतान संघाची साथ सोडली आहे. मुलतान संघाने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. ज्यामधे फ्लॉवर हे काही काळ संघापासून दूर असतील असे नमूद केले. या प्रसिद्धीपत्रकात संघाने लिहिले,
“आपले मुख्य ऍण्डी फ्लॉवर काही दिवस उपलब्ध असणार नाहीत. व्यवसायिक कारणाने ते भारतात जात आहेत. यादरम्यान ते व्हर्च्युअल माध्यमातून आपल्याशी संवाद साधतील. १३ फेब्रुवारी रोजी ते पुन्हा संघाला सामील होतील.”
मुलतान संघ पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत विजेता संघ आहे. चालू हंगामातही चार पैकी चार सामने जिंकून या संघाने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
प्रथमच खेळणार लखनऊ सुपरजायंट्स
प्रसिद्ध भारतीय उद्योगपती संजीव गोयंका हे या संघाचे मालक आहेत. लखनऊ सुपरजायंट्स क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी फ्रॅंचाईजी आहे. लखनऊ संघाने आयपीएल ड्राफ्टमध्ये केएल राहुल, मार्कस स्टॉयनिस व रवी बिश्नोई यांना आपल्या ताब्यात सामील करून घेतले आहे. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर या संघाचा मेंटर असेल. तर, भारताचे माजी यष्टीरक्षक विजय दहिया संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. नुकतेच भारताचे नेतृत्व केलेला राहुल या संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळेल.
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानची पुन्हा नाचक्की! गाजावाजा केलेला २१ वर्षीय गोलंदाज निघाला ‘फेकी’; वाचा सविस्तर
ईसीबीचा मोठा निर्णय! ऍशेस गमावल्याने ‘त्या’ व्यक्तीची केली हकालपट्टी
“मला एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायचंय”, युवा भारतीय खेळाडूने व्यक्त केली इच्छा