नॉटिंघम येथे सुरू असलेल्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने एक ऐतिहासिक कामगिरी केली. केएल राहुलला बाद करून तो जगातील तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला. राहुल त्याचा कसोटी कारकिर्दीतील ६२० वा बळी ठरला. यानंतर अँडरसनने मागे सोडलेल्या भारताच्या अनिल कुंबळे यांनी ट्विट करत अँडरसनचे अभिनंदन केले.
कुंबळे यांनी केले अभिनंदन
भारताचा दिग्गज लेगस्पिनर व माजी कर्णधार अनिल कुंबळे यांना पछाडून पुढे गेलेल्या अँडरसनचे स्वतः कुंबळे यांनी ट्विटरवरून अभिनंदन केले. त्यांनी ट्विट करत लिहीले, ‘अभिनंदन जिमी, एका वेगवान गोलंदाजाला तिथे पाहताना आनंद वाटतोय.’ कुंबळे यांच्या या खिलाडूवृत्तीचे अनेक चाहत्यांनी कौतुक केले.
Congratulations @jimmy9 Fantastic to see a fast bowler get up there. #legend @ECB_cricket
— Anil Kumble (@anilkumble1074) August 6, 2021
अँडरसनने पछाडले कुंबळे यांना
आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील १६३ वा सामना खेळत असलेल्या ३९ वर्षीय अँडरसनने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव पुढे नेत असलेल्या केएल राहुलला ८४ धावांवर यष्टीरक्षक जोस बटलरच्या हाती झेल द्यायला भाग पाडत कारकिर्दीतील ६२० वा बळी मिळविला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांना सलग चेंडूंवर बाद करत त्याने भारताच्या अनिल कुंबळे यांची बरोबरी केली होती. कुंबळे यांनी आपल्या १३२ सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत ६१९ बळी मिळवले होते.
तिसऱ्या दिवसावर भारताचे वर्चस्व
इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर आटोपल्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावात उत्कृष्ट फलंदाजी केली. सलामीवीर केएल राहुल व रोहित शर्मा यांनी ९७ धावांची सलामी दिली. मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रवींद्र जडेजाने जबाबदारीने खेळ करत वेगवान अर्धशतक झळकावले. तळाच्या फलंदाजांनी निर्णायक योगदान देत भारताला पहिल्या डावात ९५ धावांची आघाडी मिळवून दिली. भारतातर्फे सलामीवीर राहुलने सर्वाधिक ८४ धावा बनविल्या.
इंग्लंडसाठी युवा ओली रॉबिन्सनने सर्वाधिक ५ तर, अनुभवी जेम्स अँडरसनने ४ बळी आपल्या नावे केले. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद २५ धावा बनविल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
शाबास! नॅथन एलिसने पदार्पणातच घेतली हॅट्रिकच क्रिकेटविश्वातील बनला पहिला खेळाडू
अर्धशतक पूर्ण करताच मोठा फटका मारण्याच्या नादात ‘असा’ बाद झाला रविंद्र जडेजा, पाहा व्हिडिओ