भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदासोबतच भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक पद देखील एक महत्त्वाचे पद असते. अनेक माजी भारतीय खेळाडूंनी ही जबाबदारी पार पाडली आहे. यामध्ये अजित वाडेकर, कपिल देव ,अंशुमन गायकवाड यांनी ही जबाबदारी पार पाडली. २००० नंतर आलेले विदेशी प्रशिक्षकदेखील आपली छाप पाडून गेले. ज्यात जॉन राइट आणि गॅरी कर्स्टन यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांच्यावर २०१६ मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. प्रशिक्षकाची माळ कुंबळे सारख्या दिग्गजाच्या गळ्यात घातल्यामुळे इतर अनेक माजी क्रिकेटपटूंना खूप आनंद झाला होता, परंतु अनिल कुंबळे यांनी २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कर्णधार विराट कोहली सोबतच्या मतभेदानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
कुंबळे नंतर प्रशिक्षकाची जबाबदारी पुन्हा एकदा रवि शास्त्री यांच्या वर सोपविण्यात आली. शास्त्री याआधी २०१५ मध्ये भारतीय संघासोबत संचालक म्हणून कार्यरत होते. यावेळी त्यांना मुख्य प्रशिक्षक ही जबाबदारी देण्यात आली. २०१९ विश्वचषकानंतर शास्त्री यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. परंतु, त्यानंतरही त्यांच्या करारात वाढ करण्यात आली.
प्रशिक्षक बदली झाल्यानंतर याचा फटका काही खेळाडूंना देखील बसला. कुंबळे ज्या खेळाडूंना वारंवार संधी देत त्यापैकी अनेक खेळाडू शास्त्री यांच्या कार्यकाळात बऱ्याचवेळ बाकांवर बसलेले दिसतात.
आज अशाच पाच खेळाडूंविषयी जाणून घेऊया. जे कुंबळे यांच्या काळात नियमित संघाचे सदस्य होते पण शास्त्री यांच्या काळात त्यांना पुरेशा संध्या मिळाल्या नाहीत.
५. उमेश यादव ( Umesh Yadav )
भारतीय क्रिकेट संघाचा झंझावाती वेगवान गोलंदाज उमेश यादव याचे भारतीय संघासाठी मोठे योगदान आहे. उमेश यादवने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच चांगले प्रदर्शन केले आणि तो संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू बनला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये खासकरुन भारतातील खेळपट्ट्यांवर, जेथे इतर वेगवान गोलंदाजांना गोलंदाजी करायला अवघड जाते, तेथे उमेश यादवची गोलंदाजी चांगली होत होती. पण तरीही, उमेश यादवला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये परतण्याची संधी मिळाली नाही. उमेशने ७५ वनडे आणि ७ टी२० सामने खेळले आहेत. यात अनुक्रमे १०६ आणि ९ विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
२०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा वनडे सामना खेळल्यानंतर पुन्हा वनडे संघात त्याला जागा मिळाली नाही. त्याने अखेरचा टी२० सामना देखील २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्यात खेळला होता. उमेश कसोटीत संघाबरोबर आहे. पण तेथेही त्याला आलटून पालटून संधी दिली जाते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून उमेशचा पत्ता कायमचा कट झालेला दिसतो.
४. जयंत यादव ( Jayant Yadav )
२०१६ च्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात फिरकीपटू जयंत यादवचा समावेश केला गेला होता. भारतीय संघात संधी मिळाल्यानंतर जयंतने फिरकी गोलंदाजी सोबतच आपल्या नेत्रदीपक फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.
जयंत यादव याला संधी देण्याचे काम अनिल कुंबळे यांनी केले. पण, अनिल कुंबळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यानंतर जयंत यादवच्या कारकिर्दीतील वाईट काळ सुरू झाल्यासारखे झाले. रवी शास्त्रींच्या कोचिंगमध्ये जयंत पूर्णपणे संघाबाहेर झाला.
जयंत यादवने आपल्या छोट्या कारकीर्दीत ११ बळी मिळवले असून ४ कसोटींमध्ये ४५.६० च्या सरासरीने २२७ धावा केल्या आहेत. यात नवव्या क्रमांकावर फलंदाजी करत एका शतकाचा देखील समावेश आहे. रवि शास्त्रींना या खेळाडूची क्षमता कदाचित दिसली नाही. जयंत सध्या कोणत्या प्रकारात भारतीय संघाच्या आसपास देखील दिसत नाही.
३. अमित मिश्रा ( Amit Mishra )
जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये दुर्दैवी क्रिकेटपटूंची चर्चा होईल तेव्हा तेव्हा दिग्गज फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याचा त्यात समावेश असेल. कारण, अमित मिश्रामध्ये प्रचंड गुणवत्ता असूनही तो कधी भारतीय संघाचा नियमित सदस्य होऊ शकला नाही.
त्यातही, अनिल कुंबळेने अमित मिश्रावर मोठा विश्वास दाखवत त्याला तीनही प्रकारत संघाचा भाग बनवले. अनिल कुंबळे यांना बाजूला सारून जेव्हा रवि शास्त्री यांनी प्रशिक्षकाची जबाबदारी घेतली तेव्हा अमित मिश्रा हा संघाचा नियमित खेळाडू मानला जात असे.
पण त्यानंतर अमित मिश्राला अजिबात संधी मिळू शकली नाही. फिरकीपटू अमित मिश्राने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २२ कसोटी सामने, ३६ वनडे सामने आणि १० टी२० सामने खेळले आणि यात अनुक्रमे,७६,६४ व १६ विकेट्स घेतले. २०१६ मध्ये अखेरच्या वनडे सामन्यात सामनावीर बनून देखील मिश्राला पुन्हा संघात खेळण्याची संधी मिळू शकली नाही.
२. आर आश्विन ( Ravichandran Ashwin )
२०११ नंतर आर अश्विन भारतीय संघासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू होता. कसोटी क्रिकेटमधील अनेक विक्रम त्याच्या नावे जमा आहेत.
कसोटी क्रिकेटबरोबरच अश्विन वनडे आणि टी२० क्रिकेटमध्येही जोरदार कामगिरी करत होता. पण, अनिल कुंबळे यांना प्रशिक्षकपदावरून काढून टाकताच अश्विनला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जास्त संधी मिळाली नाही.
रवि शास्त्रींच्या कार्यकाळात आर अश्विन केवळ कसोटी गोलंदाज म्हणून राहिलेला आहे. कसोटी संघात सातत्यपूर्ण कामगिरी करून तो आपले स्थान कायम राखत आहे. अश्विनने भारताकडून १११ वनडे सामन्यात १५० तर, ४६ टी२० मध्ये ५२ बळी आपल्या नावे केले आहेत.
१. करुण नायर ( Karun Nair )
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वीरेंद्र सेहवागनंतर तिहेरी शतक झळकावणारा दुसरा फलंदाज होण्याचा मान मिळवणारा युवा प्रतिभावान फलंदाज करुण नायर याला देखील पुरेशी संधी मिळू शकली नाही.
अनिल कुंबळे यांनी आपल्या कार्यकाळात निवडलेला हा युवा प्रतिभावान फलंदाज रवि शास्त्रींकडून सतत दुर्लक्षित आहे. रवि शास्त्री यांच्या कारकीर्दीत करुण नायर राष्ट्रीय संघापासून दूरच आहे.
२०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावणार्या करुण नायरला २०१७ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळू शकली नाही. करुण रणजी क्रिकेटमध्ये आपल्या कर्नाटक संघासाठी नियमित धावा करीत आहे.
वाचनीय लेख –
सेहवागचा ३१९ धावांचा विक्रम मोडू शकणारे ५ भारतीय
वनडेत कधीही शुन्यावर बाद न होणारे ५ क्रिकेटपटू, एक आहे भारतीय
क्रिकेटबरोबर इतर खेळातही भारताचे नाव रोषण करणारे ३ महान क्रिकेटर