पुणे । मी आज फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. परंतु हे यश मला खडतर संघर्ष केल्यानंतरच मिळाले आहे, असे भारताची अव्वल मानांकित टेनिसपटू अंकिता रैना हिने यावेळी सांगितले.
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेसाठी पात्र ठरल्याबद्दल लक्ष्य, पीएमटीडीए व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे अंकिता रैनाचा गौरव करण्यात आला. यावेळी पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, सुंदर अय्यर, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव कुमार ताम्हाणे, अंकिताची आई ललिता रैना आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या संघर्षाच्या काळात मदत करणार्या सर्वांना तिने धन्यवाद दिले. तसेच, त्यांच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत मजल मारू शकले, असे तिने नमुद केले. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी डब्लुटीए स्पर्धा, चीनमधील स्पर्धा खेळून सराव केल्याचे तिने सांगितले. तसेच, आपला आवडता सरफेस ग्रासकोर्ट असल्याचे सांगून अंकिता म्हणाली की, क्ले कोर्टवर होणार्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेसाठी वेगळा सराव केला आहे. तसेच, आगामी विंबल्डन टेनिस स्पर्धेतही मी सहभागी होणार आहे.
युरोप किंवा अमेरिकेतील अधिक तंदरूस्त आणि बळकट शरीरयष्टी असलेल्या खेळाडूंशी तोंड देण्यासाठी प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सराव केला आहे. अशा खेळाडूंचा सामना करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सज्ज असणे आवश्यक असते. परंतु मी आता बरीच वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा खेळत असल्यामुळे अशा खेळाडूंना तोंड देण्याचा मला पुरेसा अनुभव आहे. पीवायसी आणि लक्ष्य यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मला इथपर्यंत वाटचाल करता आली. पीवायसी हिंदू जिमखाना, लक्ष्य, प्रशिक्षक हेमंत बेंद्रे आणि सुंदर अय्यर यांचे मला वेळोवेळी बहुमोल साहाय्य लाभले आहे.
पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील म्हणाले की, अंकिता फ्रेंच ओपनसाठी पात्र ठरल्यामुळे युवा खेळाडूंना यातून अधिक प्रेरणा मिळेल. यामुळे एक सर्वसाधारण घरातील मुलगी ही ग्रँड स्लॅमपर्यंत मजल मारू शकते, हा आत्मविश्वास उद्योन्मुख खेळाडूंच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.
लक्ष्यचे अभिजीत कुंटे म्हणाले की, अपयशी ठरत असतानाही अंकिताने धीर आणि संय्यम न सोडता सातत्याने प्रयत्न करणे सुरू ठेवले. या गुणांचा आदर्श सर्व खेळाडूंनी ठेवला पाहिजे.
अंकिताने बालपणापासून केलेली मेहनत आणि तिच्या आईने केलेला त्याग याची माहिती सुंदर अय्यर यांनी दिली. 16 वर्षाची असताना तिने 18 वर्षाखालील राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आणि आता पुण्यात सराव करून ग्रँड स्लॅमपयर्र्त पोहचणारी ती पहिली पुणेकर खेळाडू ठरली आहे.
तिच्यातील गुणवत्ता पाहून तिला लक्ष्यने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता आणि आपल्या कामगिरीने तो तिने सार्थ ठरविला आहे. आम्हांला अंकितासाठी अमेरिकेत काम करत असलेल्या आयटी कंपन्यातील भारतीयांनीदेखील आर्थिक मदत केली आहे. तसेच, शासनाने देखील तिला टॉप स्किम अंतर्गत मदत करण्याचे मान्य केले आहे. तिच्या आगामी वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो.