कोरोना काळात क्रीडाविश्व पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत आहे. वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम असलेल्या फ्रेंच ओपनची पात्रता फेरी सध्या सुरू आहे. मात्र, या पात्रता फेरीतून भारतासाठी एक निराशजनक बातमी समोर आली. अव्वल भारतीय महिला टेनिसपटू अंकिता रैना हिला पात्रता फेरीत दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने फ्रेंच ओपनच्या मुख्य स्पर्धेत स्थान मिळवता आले नाही. अंकिता पात्रता फेरीत लढणारी एकमेव भारतीय महिला टेनिसपटू होती.
एकतर्फी झाली लढत
टेनिसमधील मानाचा चार ग्रँडस्लॅमपैकी वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपनच्या पात्रता फेरीत खेळण्याची संधी अंकिता रैना हिला मिळाली होती. तिने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अनिओ रोडीओनोवावर मात केलेली. दुसऱ्या फेरीत मात्र तिला बेल्जियमच्या ग्रीट मिनेन हिने ६-२,६-० असे सहजरीत्या पराभूत केले. यामुळे सलग सातव्यांदा कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश करण्यापासून अंकिता वंचित राहिली. फ्रेंच ओपनच्या मुख्य फेरीला ३० मेपासून सुरुवात होईल.
पुण्यामध्ये सराव करते अंकिता
मूळची कश्मीरी असलेली अंकिता देशांतर्गत टेनिसमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व करते. मात्र, ती पुण्यामध्ये प्रसिद्ध पीवायसी जिमखाना येथे प्रशिक्षण घेते. २८ वर्षीय अंकिताने २०१८ जकार्ता आशियाई खेळांमध्ये महिला एकेरी प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिलेले. कारकीर्दीच्या सुरुवातीला तिला ‘ज्युनियर सानिया’ असे देखील म्हटले जात. अंकिता सध्या आंतरराष्ट्रीय एकेरी रँकिंगमध्ये १२५ तर दुहेरी रँकिंगमध्ये ९३ व्या स्थानी आहे.
महिला एकेरीत होणार मोठी स्पर्धा
यावर्षीच्या फ्रेंच ओपन महिला एकेरीत मोठी स्पर्धा होऊ शकते. गतविजेत्या पोलंडच्या ईगा स्वियाटेक हिच्यापुढे विजेतेपद टिकविण्याचे आव्हान असेल. तर, सिमोना हालेप, अॅश्ले बार्टी, सोफिया केनन, नाओमी ओसाका या सर्वजणी विजेतेपदासाठी झुंज देतील. ३९ वर्षीय दिग्गज सेरेना विल्यम्स ही आपले २४ वे ग्रँडस्लॅम तर पाचवे फ्रेंच ओपन जिंकण्याचा प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट इतिहासातील चार अविश्वसनीय विक्रम, ज्यांना मोडणे आहे जवळपास अशक्यच
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल कोण जिंकणार? पॅट कमिन्सचा या संघाला कौल
इंग्लंडला दुखापतींचे ग्रहण, आर्चर पाठोपाठ हा खेळाडू दुखापतग्रस्त