मोंटे कार्लो | क्ले कोर्ट किंग अशी ओळख असणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने रोलेक्स मोंटे कार्लो मास्टर्सची अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने ग्रिगोर डिमिट्रोवला ६-४, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.
१ तास ३२ मिनीटे चाललेल्या या सामन्यात नदालने डिमिट्रोवला कोणतीही संधी दिली नाही. एकवेळ नदाल पहिल्या सेटमध्ये ३-० असा आघाडीवर होता परंतू चांगला खेळ करत ग्रिगोर डिमिट्रोवने त्याला या सेटमध्ये संघर्ष करायला लावला.
दुसऱ्या सेटमध्ये तर डिमिट्रोवला एकचं गेम जिंकता आला. यावरून नदालच्या खेळाचा अंदाज येतो.
क्ले कोर्ट किंग अशी ओळख असणाऱ्या या खेळाडूने आज अतिशय सफाईदार खेळ केला. नदालला या स्पर्धेत अव्वल मानांकन असून ग्रिगोर डिमिट्रोवला चतुर्थ मानांकन होते.
२०१७च्या फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीपासून नदालने सलग ३४ सेट क्ले कोर्टवर जिंकले आहेत. या स्पर्धेत नदाल ६व्यांदा एकही सेट न गमावता अंतिम फेरीत पोहचला आहे.
नदालचाआजचा सामना हा १०१वा सामना होता ज्यात त्याने क्ले कोर्टवर एटीपी क्रमवारीत टाॅप १० खेळाडूचा सामना केला. क्ले कोर्टवर टाॅप १० मधील खेळाडूंसोबत खेळताना नदालने ८४ विजय आणि १७ पराभव पाहिले आहेत.
नदालचा हा या स्पर्धेतील ६७ वा विजय असून त्याने ४ पराभव पाहिले आहेत. त्याची ही या स्पर्धेची १२वी अंतिम फेरी आहे.
त्याने यापुर्वी याच स्पर्धेचे विक्रमी १०वेळा विजेतेपद जिंकले आहे. केवळ २०१४ मध्ये तो येथे उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. जर त्याने यावेळी पुन्हा विजेतेपद जिंकले तर तो प्रथमच कोणतीही स्पर्धा ११व्यांदा जिंकेल.
नदाल आणि जोकाविचने एटीपी मास्टर्सची प्रत्येकी३० विजेतेपदं मिळवली असून नदालला त्याच्या पुढे जाण्याचीही मोठी संधी आहे.
एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी राहण्यासाठीही नदालला या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणे गरजेचे आहे. जर तो येथे पराभूत झाला तर राॅजर फेडरर पुन्हा अव्वल स्थानी विराजमान होणार आहे.