जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर (आयपीएल २०२२) चा पंधरावा हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे. त्यासाठी संघांनी तयारी सुरू केली आहे. बीसीसीआयने आयपीएल २०२२ चे वेळापत्रकही जाहीर केले आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. दिल्लीने रिटेन केलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए (Anrich Nortje) आगामी हंगामातून बाहेर होऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, तो नोव्हेंबरपासून जास्त क्रिकेट खेळला नाही. त्यामुळे मेडिकल टीम त्याच्या आयपीएलमधील समावेशाबाबत नंतर माहिती जाहीर करेल.
दक्षिण आफ्रिका व बांगलादेश (SAvBAN) यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. नॉर्किए आणि सिसांडा मगाला यांच्याशिवाय या संघात सर्व प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.
सेंच्युरियन आणि जोहान्सबर्ग येथे १८ ते २३ मार्च दरम्यान तीन सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. आयपीएल सुरू होण्याच्या अवघ्या तीन दिवस आधी ही मालिका संपणार आहे. याचा एक अर्थ असा होऊ शकतो की, वनडेसाठी निवडलेले दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू कदाचित आयपीएलचे सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाहीत. आयपीएलमध्ये सहभागी होणार्या दक्षिण आफ्रिकेच्या संघात आठ खेळाडूंचा समावेश आहे ज्यात कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, डेव्हिड मिलर, क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, ड्वेन प्रिटोरियस आणि मार्को जेन्सन यांचा समावेश आहे.
आयपीएलच्या बायो बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, संघातील सर्व खेळाडूंना तीन दिवसांच्या क्वारंटाईनचे पालन करणे बंधनकारक आहे. परंतु जर खेळाडू दुसर्या बायो बबलमधून येत असतील तर हा नियम शिथिल केला जाईल. दक्षिण आफ्रिका-बांगलादेश मालिका कोविड नियमांनुसार खेळवली जाईल. त्याचे नियम पूर्वीपेक्षा थोडे सोपे असतील. खेळाडूंना या वेळी बबलच्या बाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
इंजीच्या पुतण्याने कांगारुंना चोप चोप चोपलं, पहिल्याच कसोटीत रचले मोठे विक्रम (mahasports.in)
जर्मन ओपन स्पर्धेत सिंधू-श्रीकांतचा विजयाने श्रीगणेशा; लक्ष सेनवरही राहणार नजर (mahasports.in)