भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांना कर्करोग झाला आहे. विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी यासाठी बीसीसीआयकडे आर्थिक मदतीची विनंती केली आहे. अंशुमन गायकवाड भारताकडून दीर्घकाळ खेळले असून ते टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकही राहिले आहेत.
कपिल देव यांनी सांगितलं की, मोहिंदर अमरनाथ, सुनील गावस्कर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, मदन लाल, रवी शास्त्री आणि कीर्ती आझाद यांसारखे इतर अनेक माजी भारतीय क्रिकेटपटू मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. या संकटाच्या वेळी भारतीय क्रिकेट बोर्ड पुढे येऊन आजारी गायकवाड यांना आधार देईल, असा विश्वास कपिल देव यांनी व्यक्त केलाय.
अंशुमन गायकवाड यांना रक्ताचा कर्करोग झाल्याची बातमी त्यांचे सहकारी संदीप पाटील यांनी या महिन्याच्या सुरुवातीला दिली होती. गायकवाड एक वर्षापासून या आजाराला झुंज देत असून ते उपचारासाठी लंडनमध्ये होते. गायकवाड यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचं पाटील यांनी म्हटलंय.
कपिल देव यांची इच्छा आहे की, बीसीसीआयमध्ये अशी व्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून माजी क्रिकेटपटूंना अशा परिस्थितीत मदतीची गरज भासल्यास बोर्डानं त्यांना मदत करावी. “क्रिकेटमध्ये आता जेवढे पैसे मिळत आहेत, त्यावेळी एवढे पैसे मिळत नव्हते. यामुळे अनेक माजी क्रिकेटपटू महागडे उपचार घेण्याइतके आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत”, असं ते म्हणाले आहेत.
कपिल देव म्हणाले, “दुर्दैवानं, आमच्याकडे कोणतीही यंत्रणा नाही. या पिढीचे खेळाडू चांगले पैसे कमावत आहेत हे पाहून खूप आनंद आहे. सपोर्ट स्टाफ सदस्यांनाही चांगला पगार मिळतो. आमच्या काळात बोर्डाकडे आजच्या इतके पैसे नव्हते. आता त्यांच्याकडे पैसे आहेत आणि त्यांनी पूर्वीच्या ज्येष्ठ खेळाडूंची काळजी घेतली पाहिजे.”
महत्त्वाच्या बातम्या –
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रथमच 4 नवीन खेळांचा समावेश, उद्घाटन समारंभही असेल खास
एकदा-दोनदा नव्हे, पाकिस्तानात अनेकवेळा झाला आहे भारतीय खेळाडूंवर हल्ला
है घर, है पैसा, है गाड़ी…,जेम्स अँडरसनची नेट वर्थ हनी सिंगच्या या गाण्याला साजेशी, जाणून घ्या एकूण संपत्ती