प्रो कबड्डीच्या ५व्या पर्वासाठी यू मुम्बाने आपल्या संघाचे नेतृत्त्व अनुप कुमारकडेच कायम ठेवले आहे. पाचही पर्वात एकच कर्णधार असणारा यू मुम्बा एकमेव संघ असेल! पूर्वीच्या चारही पर्वांमध्ये अनुप कुमारनेच संघाचे नेतृत्व केले होते.
‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुप कुमारची तुलना महेंद्रसिंग धोनी बरोबर केली जाते. धोनीप्रमाणेच तोही मोक्याच्या क्षणी संयम ठेवून संघाची नौका पार लावतो. आपल्या सहकाऱ्यांकडून सर्वोत्तम खेळ करवून घेण्याची हातोटी अनुपकडे आहे. प्रो कबड्डीतला तो सर्वोत्तम कर्णधार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही!
मैदानावर नेहमीच कर्णधाराला साजेसे असे वर्तन आणि खेळ करण्यात तो कधीही कमी पडत नाही. कबड्डी हा आक्रमक खेळ आहे त्यामुळे त्यातले खेळाडूही आक्रमक असतात; अनुप मात्र त्याला अपवाद आहे. आपला संघ वाईट खेळत असो वा चांगला अनुप कधीच आपला तोल ढळू देत नाही. शांततेने परिस्थितीतचे आकलन करून तो खेळत असतो आणि मुख्य म्हणजे आपल्या सहकार्यांना खेळवत असतो!
कर्णधार म्हणून अनुपला नावे ठेवण्यास जागा नाहीच पण एक चढाईपटू म्हणूनही त्याला नाव ठेवण्यास जागा नाही. बोनस गुण मिळवण्यात तरबेज असलेल्या अनुपला ‘बोनस का बादशाह’ म्हणतात! त्याचे ‘टो-टच’ आणि ‘रंनिंग हॅन्ड टच’ ही वैशिष्ट्ये तर अगदी डोळ्याची पारणे फेडतात.
मात्र सध्या ज्याप्रमाणे धोनीच्या फलंदाजीबद्दल शंका घेतल्या जात आहेत अगदी तशाच शंका उपस्थित केल्या जात आहेत अनुपबद्दल! अनुपच्या चढाया एकसारख्या असतात त्यामुळे त्याच्याविरोधात योजना बनवणे सोपे होते.अर्थात आतापर्यंत तरी त्याने या योजना फारश्या यशस्वी होऊ दिल्या नाहीत मात्र त्याची सुरुवात आता झाली आहे असे म्हणता येईल. उदाहरणच द्यायचे झाले तर राष्टीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘सर्विसेस’ च्या सुर्जीत सिंग आणि नितीन तोमर यांनी त्याला चांगलेच जखडवून ठेवले होते. परिणामी हरयाना संघ तो सामना हारला सुध्दा.
दुसरे उदाहरण म्हणजे ‘विश्वचषक स्पर्धा २०१६’-अंतिम सामना! फझल अत्राचाली आणि मिराज शेख यांनी अनुपसाठी ‘बोनस’ घेणेही कठीण करून ठेवले होते! या सामन्यानंतर अनुप निवृत्त होतो की काय अशीही चर्चा सुरु झाली होती. मात्र अनुपच्या आईने “माझ्या मुलात अजून भरपूर कबड्डी शिल्लक आहे” असे सांगून या चर्चांना पूर्णविराम दिला.
इतकी वर्षे सातत्याने खेळल्यानंतर तुमच्या उणीवा समोर येणे स्वाभाविक आहे मात्र त्या उणिवांवर जो मात करतो तोच खरा खेळाडू म्हणावा.
धोनी ज्या प्रमाणे टीकाकारांना नेहमी आपल्या बॅट ने उत्तर देत आला आहे त्याचप्रमाणे अनुपही आपल्या टीकाकारांना आपल्या कबड्डीतून उत्तर देईल यात शंका वाटत नाही कारण शेवटी “Form is temporary,Class is permanent!”
-शारंग ढोमसे (टीम महा स्पोर्ट्स )