भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान गुरूवारपासून (१७ डिसेंबर) चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शुभारंभ झाला. ऍडलेड येथे सुरू झालेल्या या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी भारताचे प्रमुख ६ फलंदाज २३३ धावांवर बाद करत, भारताला बॅकफूटवर ढकलले आहे. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान विराट धावबाद झाला. धावबाद होताच विराटने सौरव गांगुलीच्या एका नकोश्या कामगिरीची बरोबरी केली.
ऑस्ट्रेलियाने पहिला दिवस केला आपल्या नावे
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावल्यानंतर उत्कृष्ट फलंदाजी करत भारताचा सलामीवीरांना लवकर तंबूत पाठवले. चेतेश्वर पुजारा व कर्णधार विराट कोहली यांनी संयमी फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. पुजारा बाद झाल्यानंतरही, उपकर्णधार अजिंक्य रहाणे व कर्णधार विराट कोहलीने ८८ धावांची भागीदारी करून, भारतीय धावसंख्येला आकार दिला. विराट बाद झाल्यानंतर, भारताची काहीशी पडझड झाली. दिवसाखेर भारताची धावसंख्या ६ बाद २३३ अशी राहिली. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक दोन बळी मिळवले.
१७ वर्षांनी कोणताही भारतीय कर्णधार ऑस्ट्रेलियात धावबाद
भारतीय कर्णधार विराट कोहली हा या डावात चांगल्या लयीमध्ये दिसला. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोस हेजलवूड व नॅथन लायन या दर्जेदार गोलंदाजांचा सामना करताना विराटने ७४ धावांची सर्वांगसुंदर खेळी केली. मात्र, अजिंक्य रहाणेने दिलेल्या एका चुकीच्या कॉलमुळे विराट दुर्दैवीरीत्या धावबाद झाला.
याचबरोबर विराट कोहली ऑस्ट्रेलियात धावबाद पद्धतीने बाद होणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला. विराटच्या आधी सौरव गांगुली भारताचा कर्णधार असताना २००३ मालिकेवेळी धावबाद झाला होता. त्यानंतर, तब्बल १७ वर्षांनी कोणताही भारतीय कर्णधार ऑस्ट्रेलियात कसोटी खेळताना धावबाद झाला आहे.
दहा वर्षानंतर विराट झाला कसोटीत धावबाद
विराट कोहली आपल्या दहा वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत फक्त दुसऱ्यांदा धावबाद झाला आहे. २०११ च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्येच तो पहिल्यांदा धावबाद झाला होता. विशेष म्हणजे तो सामनाही ऍडलेडच्या ऍडलेड ओव्हल मैदानावर खेळला गेला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सर्व कसोटी सामन्यात केला पाहिजे ‘या’ चेंडूचा वापर’, महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे मत
दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला विराट; केली ‘ही’ अचाट कामगिरी
ऑस्ट्रेलियात मैदान गाजवणारा अष्टपैलू हार्दिक पंड्या घालवतोय पत्नीसोबत वेळ; फोटो व्हायरल