किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुलचे सध्या सगळीकडे कौतूक होत आहे. यात माजी क्रिकेटर इयान बिशप व गौतम गंभीरही मागे नाहीत. राहुल एक उत्कृष्ट फलंदाज असल्याचे भाष्य या दोघांनीही केले आहे.
केएल राहुलच्या खेळीबाबत वेस्टइंडीजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप म्हणाला की, “मी त्याची फलंदाजी पाहिली आहे. सुरुवातीला तो संथ गतीने खेळला. तो चांगले फटके खेळत होता. त्याचे काही झेल सुटले परंतु शेवटपर्यंत त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली आणि तो ज्या प्रकारे खेळपट्टीवर खेळत होता, हे पाहून तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे असे मला वाटते.”
इयान बिशपने केलेल्या वक्तव्यावर सहमती दर्शविताना माजी भारतीय सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर म्हणाला की, “मी इयान बिशपशी सहमत आहे आणि सध्या राहुल आयपीएल 2020 मधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. पुढे होणाऱ्या सामन्यात राहुल आपला फॉर्म कायम राखेल व संघाला प्लेऑफमध्ये नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल.”
आयपीएलमध्ये शनिवारी (24 सप्टेंबर ) झालेल्या सहाव्या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा 97 धावांनी पराभव केला. पंजाबने 16 षटकांत 132 धावा केल्या होत्या. त्यानंतर कर्णधार केएल राहुलने आक्रमक फलंदाजी करत 20 षटकात 206 ही मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची कामगिरी बजावली. राहुलने या सामन्यात 69 चेंडूत 132 धावांची खेळी केली. आयपीएलमध्ये भारतीय फलंदाजाकडून केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
पंजाब संघाचा पुढील सामना रविवारी 27 सप्टेंबर रोजी स्टीव्ह स्मिथच्या राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. त्यामुळे केएल राहुलकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
2014 मध्ये पंजाबने बाद फेरी गाठली होती. 2014 मध्ये आयपीएलचे सुरुवातीचे 20 सामने युएईमध्ये खेळले गेले होते. यावेळी संपुर्ण स्पर्धाच या देशात होत आहे. त्यामुळे पंजाबला मोठी संधी आहे.