मुंबई दि. २२ – महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे विद्यमान कार्याध्यक्ष, मुंबई उपनगर कबड्डी असो.चे माजी अध्यक्ष व मुख्य आश्रयदाते आणि कबड्डी या देशी खेळावर नितांत प्रेम करणारे मुंबईचे धडाडीचे खासदार गजानन कीर्तिकर यांची केंद्राच्या युवा व खेळ मंत्रालयाच्या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
गजानन कीर्तिकर यांनी अखिल भारतीय फेडशन कप कबड्डी स्पर्धा (२०१८), महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा (२०१०), मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धा (२०१३, २०१५ व २०१७) यांचे भव्यदिव्य असे यशस्वी आयोजन केले. तसेच दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धा (२००० व २००३), भारत श्री शरीर सौष्ठव स्पर्धा (२००६), जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धा (२०१४) या स्पर्धाचे देखील यशस्वी आयोजन केले. या सर्व कार्याची व देशी खेळावरील प्रेमाची दखल घेत केंद्र शासनाच्या क्रीडा खात्याने त्यांची ही नियुक्ती केली आहे.
त्याच्या या नियुक्तीने क्रीडा जगतात उत्साही व आनंदी वातावरण पसरले आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याचा सर्वाधिक आनंद कबड्डी वर्तुळात झाला आहे. कीर्तिकारांच्या या नियुक्तीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या मुकुटात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.