मुंबई । इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर याने बायो प्रोटोकॉल तोडल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यांमधून संघाबाहेर ठेवण्यात आले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्या आणि अंतिम कसोटी सामन्यात तो संघात परतला. इंग्लंडच्या 14 सदस्यीय संघात आर्चर व्यतिरिक्त जेम्स अँडरसन आणि मार्क वुड यांचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी मॅनचेस्टरमध्ये तिसरा कसोटी सामना सुरू होईल.
पहिल्या कसोटीनंतर तो घरी गेला होता. म्हणून 25 वर्षीय आर्चरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले. कारण त्याने ‘बायो प्रोटोकॉल’चा नियम तोडला होता. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) या गोलंदाजाला 15,000 पौंड (सुमारे 14 लाख रुपये) दंड ठोठावला. आर्चरच्या दिलगिरीनंतर, ईसीबीने त्याला तिसरा कसोटी खेळण्यास मान्यता दिली.
दुसर्या कसोटीत अँडरसन आणि वुडला विश्रांती देण्यात आली. त्याच्याऐवजी इंग्लंडच्या संघात स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वॉक्सची निवड झाली. आता शेवटच्या सामन्यात टीम मॅनेजमेंट कोणत्या वेगवान गोलंदाजांना संधी देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण शेवटच्या कसोटीत ब्रॉड, सॅम करन आणि वोक्स या त्रिकुटाने चांगली गोलंदाजी केली. सामन्यात ब्रॉडने 6, तर वोक्सने 5 गडी बाद केले. अशा परिस्थितीत टीम मॅनेजमेंटला तिसर्या कसोटीत या दोन्ही गोलंदाजांकडे दुर्लक्ष करणे कठीण होईल.
इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी आहे. वेस्ट इंडिज संघाने साऊथॅम्प्टनमधील पहिली कसोटी 4 गडी राखून जिंकली, तर इंग्लंडने मॅंचेस्टरमध्ये 113 धावांनी विजय मिळविला. वेस्ट इंडिजला 32 वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. त्याने 1988 मध्ये अखेर 5 कसोटी सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली होती. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ विस्डेन करंडक टिकवून ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करेल. इंग्लंडने 6 वर्षांत कसोटी मालिका गमावली नाही.
तिसर्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघः
जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डोमिनिक बाईस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रॉली, सॅम करन, ओली पोप, डोम सिब्ली, बेन स्टोक्स, ख्रिस वॉक्स, मार्क वुड






